मुंब्रा शहरात मात्र एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोनाची परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी कळव्यातील काही भागांमध्ये करोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने महापालिका यंत्रणा सतर्क झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कळवा परिसरात १५ पेक्षा कमी करोना रुग्ण आढळून येत होते. रविवारी झालेल्या चाचण्यांमध्ये या भागात ३७ रुग्ण आढळून आले आहेत. त्याशेजारी असलेल्या मुंब्रा भागात मात्र शून्य रुग्ण असल्याची नोंद झाली आहे. तर, शहराच्या इतर भागांमध्ये २० च्या आत रुग्ण आढळले आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये तीन महिन्यांपूर्वी आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. शहरामध्ये दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनानंतर शहरात करोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून शहरात आता दररोज शंभर ते सव्वाशे रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये मोठी गृहसंकुले असलेला घोडबंदर आणि  नौपाडा-कोपरी परिसर रुग्णसंख्येत आघाडीवर होता. त्या तुलनेत दाटीवाटीचा परिसर असलेल्या लोकमान्य-सावरकरनगर, वागळे इस्टेट, उथळसर, कळवा, मुंब्रा, दिवा या भागांमध्ये कमी रुग्ण आढळून येत होते. या सर्वच भागांतील करोना संसर्ग रोखण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. या सर्वच भागांमध्ये २० च्या आत रुग्ण आढळून येत होते. मात्र, कळव्यातील काही भागांमध्ये रविवारी अचानकपणे रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. गेल्या काही दिवसांपासून दररोज १५ च्या आत रुग्ण आढळणाऱ्या कळवा परिसरात रविवारी ३७ रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासनही सावध झाले आहे.

 

चाचण्या वाढल्याचा परिणाम

कळवा परिसरामध्ये यापूर्वी दररोज २५० ते ३०० करोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यामध्ये केंद्रावर येणाऱ्या करोना संशयित रुग्णांचीच चाचणी केली जात होती; परंतु गेल्या काही दिवसांपासून कळवा परिसरात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. दररोज पाचशेच्या पुढे करोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये ४०० शीघ्र प्रतिजन तर १२५ ‘आरटीपीसीआर’ चाचण्या केल्या जात आहेत. एखाद्या इमारतीत किंवा परिसरात रुग्ण आढळून आला तर, त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची चाचणी केली जात आहे. चाचण्यांची संख्या वाढल्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ झाल्याचा दावा कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी केला. चाचण्या वाढविल्यामुळे रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचार देण्याबरोबरच करोना संसर्गही आटोक्यात आणणे सोपे होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उपचाराधीन रुग्ण एक हजाराच्या आत

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग गेल्या काही दिवसांपासून कमी होत असून आता शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एक हजारांच्या आतमध्ये आली आहे. त्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी म्हणजेच ०.७३ टक्का इतके आहे. शहरात आतापर्यंत १६ लाख ९८ हजार २८० करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये आतापर्यंत १ लाख ३२ हजार १५६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २९ हजार १८१ (९७.७५ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. १ हजार ९९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सद्य:स्थितीत शहरात ९७९ रुग्ण उपचार घेत आहेत.