कल्याणमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णाने ट्रेनने प्रवास करत एका लग्नाला हजेरी लावली होती. ही माहिती समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून धावपळ सुरु झाली असून एक विशेष टीम गठीत करण्यात आली आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती ही टीम गोळा करत आहे. कल्यामधील रुग्णाला मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती जवळपास एक हजार लोकांच्या संपर्कात आली असावी. पूर्वकाळजी म्हणून वैद्यकीय तपासणी केली असता अद्याप तरी कोणामध्येही करोनाची लक्षणं आढळून आलेली नाहीत. कल्याणमध्ये आतापर्यंत करोनाचे तीन रुग्ण आढळलेले आहेत. कल्याणमधील ही व्यक्ती ६ मार्च रोजी अमेरिकेहून मुंबईला परतली होती. विमानतळावर उतरल्यानंतर त्याने टॅक्सीने कल्याणपर्यंत प्रवास केला होता. नंतर त्याच संध्याकाळी त्याने सोलापूरला नातेवाईकाच्या लग्नात जाण्यासाठी हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास केला होता.

दरम्यान गांभीर्य लक्षात घेता कल्याण डोंबिवली महापालिकेने सोलापूर आणु पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून रुग्णाच्या प्रवासासंबंधी माहिती दिली आहे. याशिवाय त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळवण्यासही सांगितलं आहे.

९ मार्च रोजी संबंधित व्यक्तीमध्ये करोनाची लक्षणं आढळली होती. यानंतर कस्तुरबा रुग्णालयात त्याची तपासणी करण्यात आली. त्यांच्या पत्नी आणि मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला केडीएमसीकडून पत्र मिळालं आहे. त्यानुसार आम्ही त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती मिळवण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे. जिल्हा प्रशासनाने पाच सदस्यांच्या एकूण १० टीम तयार केल्या आहेत. ग्रामस्थ, ग्रामसेवकांच्या मदतीने त्या लग्नात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची माहिती मिळवली जात आहे. अद्याप तरी कोणामध्येही करोनाची लक्षणं आढळलेली नाहीत”.