लोकसत्ता प्रतिनिधी

उल्हासनगर : महापालिकेच्या कोविड रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या हंगामी डॉक्टरांना पालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका सोमवारी रात्री बसला. पालिकेने वेळीच बिलाची रक्कम भरली नसल्यामुळे शहरातील धरमदास दरबार येथे निवासाची व्यवस्था असलेल्या डॉक्टरांना दरबार प्रशासनाने रात्री दहाच्या सुमारास बाहेर काढले. याची माहिती मिळताच शिवसेनेच्या नगरसेवकांनी डॉक्टरांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली.

शहरातील धरमदास दरबार आश्रमात पालिकेने ७ महिला आणि ४ पुरुष डॉक्टरांच्या राहण्याची सुविधा गेल्या आठ महिन्यांपासून केली आहे. सोमवारी रात्री या दरबार प्रशासनाने डॉक्टर राहत असलेल्या खोल्यांचा वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्याने डॉक्टरांना खोल्यांबाहेर पडण्याची वेळी आली. पालिका प्रशासनाने दरबार आश्रमाचे गेल्या सहा महिन्यांपासून बिल अदा केले नाही. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. ही माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आश्रमात धाव घेतली. दरबारच्या प्रशासनाची वागणूक डॉक्टरांच्या प्रति चुकीची असून करोनाच्या संकटात काही काळ वाट पाहण्याची गरज होती, असे मत सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक अरुण आशान यांनी व्यक्त केले. या नगरसेवकांनी डॉक्टरांची व्यवस्था जवळच्याच हॉटेलांत केली, मात्र या मुद्दय़ावरून आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका सातत्याने डॉक्टरांना बसत असून सत्ताधाऱ्यांचे हे अपयश असल्याचा आरोप मनसेचे सचिन कदम यांनी केला. तर दरबारची प्रतिमा मलिन करण्यासाठी आणि आपले अपयश लपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी हा डाव रचल्याचा आरोप नगरसेवक टोनी सिरवानी यांनी केला. पालिका प्रशासनाने नुकतेच लाखो रुपयांचे खासगी हॉटेलचे बिल अदा केले, मात्र आम्ही अवघ्या ३०० रुपयांत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करत असताना आम्हाला एक दमडीही अदा केली जात नाही. सोमवारी दिवसभर आम्हाला बिल देण्याचे आश्वासन दिले. मात्र बिल अदा केलेच नाही. त्यामुळे दरबार प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. पालिका प्रशासनाने सोमवारी रात्री उशिरा मंगळवारचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही डॉक्टरांना पुन्हा दरबारमध्ये ठेवले. मात्र आपले अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाने राजकारण करत डॉक्टरांना मध्यरात्री हॉटेलमध्ये हलविल्याचा आरोप टोनी सिरवानी यांनी केला आहे.