ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये करोनाचे तीन रुग्ण आढळले आहेत. करोनाची लागण झालेल्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलीचा समावेश आहे. तिघांनाही सध्या बदलापूर पालिकेच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे. नंतर त्यांना उल्हासनगरच्या कोव्हीड स्पेशल हॉस्पिटलमध्ये हलवणार असल्याची माहिती बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि २० वर्षीय मुलीला करोनाची लागण झाली आहे. लॉकडाउन असताना साताऱ्याला नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी ते गेले होते. तिथे करोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. तर वोकहार्ट हॉस्पिटलच्या बदलापुरात राहणाऱ्या कर्मचाऱ्याला (वय २८) करोनाची लागण झाली आहे. तिघांना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात करोनाचे ९२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाबाधितांचा आकडा १६६६ वर पोहचला आहे. तर ११० जणांचा मृत्यू झाला आहे. १८८ जणांवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे.