संसर्ग कमी झाल्याने प्रमाण कमी झाल्याचा दावा;  दोन आठवडय़ांपूर्वीपेक्षा परिस्थितीत सुधारणा

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ात दररोज आढळून येणाऱ्या करोना रुग्णसंख्येत घट होऊ लागली असून दुसरीकडे चाचण्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. राज्य शासनाने दुकानदार आणि विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना चाचण्या करणे बंधनकारक केल्यामुळे मध्यंतरी सर्वच शहरांमधील चाचण्यांची संख्या वाढली होती. टाळेबंदीतील र्निबध अधिक कठोर झाल्याने चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. विशेष म्हणजे, संसर्गाचे प्रमाणदेखील कमी झाल्याने चाचण्या मंदावल्याचा दावा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केला जात आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये काही दिवसांपूर्वी दररोज १० ते १३ हजार करोना चाचण्या केल्या जात होत्या. त्यातून सरासरी १५०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. मात्र, दैनंदिन चाचण्यांची संख्या आता सहा ते सात हजार इतकी असून त्यातून सरासरी ७०० ते ८०० करोनाबाधित आढळून येत आहेत. करोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या कठोर र्निबधांचे अपेक्षित परिणाम दिसू लागल्याचा दावा ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी केला. ‘र्निबधांच्या पहिल्या टप्प्यात राज्य शासनाने दुकानदार आणि विविध कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना चाचण्या करणे बंधनकारक केले होते. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढली होती. सुरुवातीच्या काळात मजुरांच्या चाचण्यांचे प्रमाणही अधिक होते. त्यातील बरेचशे गावी गेले. त्यामुळेही चाचण्या कमी होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे संसर्गाचे प्रमाण कमी होत असल्याचे हे निदर्शक आहे,’ असे माळवी म्हणाले.

ठाणे शहरात एप्रिल महिन्याच्या मध्यावर दररोज पाच ते सहा हजार रुग्ण आढळून येत होते. हे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून साडेतीन ते चार हजारांपर्यंत स्थिरावले आहे. चाचण्या मुद्दाम कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. लक्षणे जाणवताच चाचण्यांसाठी पुढे येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. चाचण्या कमी होत आहेत याचा अर्थ संसर्ग कमी होत आहे असाही होतो, असा दावा ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला.

भिवंडी शहरात २० ते २६ एप्रिल या कालावधीत दररोज सरासरी ८०० ते एक हजार करोना चाचण्या करण्यात येत होत्या. या कालावधीत दिवसाला सरासरी ६० ते ८० करोनाबाधित आढळून येत होते. गेल्या तीन दिवसांपासून भिवंडी शहरात दिवसाला सरासरी ४५० ते ५०० करोना चाचण्या होत असून दिवसाला ३० ते ४० रुग्ण आढळून येत आहेत. या संदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्याशी संपर्क साधला असता, करोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले नसल्याचा दावा त्यांनी केला. ‘आमचे वैद्यकीय कर्मचारीही अतिजोखमीच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या करोना चाचण्या करत आहेत’, असे ते म्हणाले.

कल्याण, डोंबिवलीत मात्र वाढ

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या आठवडय़ात ४ हजार ८४० ते ५ हजार २२० इतक्या चाचण्या होत होत्या. त्यातून एक हजार ४०० ते एक हजार ६०० रुग्ण सापडत होते. चालू आठवडय़ात दररोज पाच हजार ९००पर्यंत चाचण्या केल्या जात असून त्यातून एक हजार ८०० रुग्ण आढळून येत आहेत.  ‘करोना चाचणी केंद्रावर जेवढे रहिवासी चाचणीसाठी येतात. त्यामधील जे सकारात्मक आढळतात, त्यांची दररोजची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. चाचण्यांचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांपासून वाढविले आहे. गेल्या आठवडय़ात २ हजार ५०० हून अधिक आणि चालू आठवडय़ात तीन हजारांहून अधिक करोना चाचण्या करण्यात येत आहेत,’ असे महापालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी सांगितले.

अन्य शहरांत चढउतार

अंबरनाथ नगरपालिकेची दिवसाला एक हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र दररोज सरासरी ५०० ते ६०० संशयितांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

बदलापूर शहरात सरासरी ४५० ते ५०० चाचण्या केल्या जात असल्याचे पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी दिली आहे. यात अनेकदा चाचण्या कमी-जास्त होत असतात.

उल्हासनगर शहरात दररोज ६५० ते ७०० चाचण्या केल्या जात असल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी दिली.