शरद पवारांकडून पाठराखण; वसंत डावखरे यांच्या प्रचारासाठी संयुक्त मेळावा
काँग्रेसमुक्त भारत हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे दिवास्वप्न असून देश सावरण्यासाठी गांधी-नेहरूंच्या विचारांच्या काँग्रेसशिवाय पर्याय नाही, या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी काँग्रेसची पाठराखण केली.
आणीबाणीनंतर इंदिरा गांधी, संजय गांधींसह काँग्रेसच्या सगळ्या बडय़ा नेत्यांचा पराभव झाला होता. देशातील जवळपास सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसचा एकामागोमाग एक पराभव होत होता. तेव्हाही २५ वर्षे काँग्रेसचे देशात नाव दिसणार नाही असे बोलले जात होते. मात्र, अवघ्या दोन वर्षांत काँग्रेसचे दमदार पुनरामगन झाले. या इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि प्रागतिक विचारांच्या हाती पुन्हा हा देश जाईल हे चित्र मला दिसते आहे, असे भाकीतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
विधान परिषदेच्या ठाणे, पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार वसंत डावखरे यांच्या प्रचारासाठी तीन हात नाका येथील टिपटॉप प्लाझा सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, नारायण राणे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, गणेश नाईक, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर होते.
पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर सडकून टीका करतानाच काँग्रेसमुक्त भारत या भाजपच्या घोषणेची खिल्ली उडविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात सगळीकडे आबादीआबाद असल्याचे चित्र दाखवीत आहेत. दोन वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारने देशभरातील वर्तमानपत्रांमधून सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या. वाजपेयी सरकारच्या काळातही भाजपने इंडिया शायनिंगचा असाच प्रयोग करून पाहिला आहे. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या काही चुका झाल्या. यावेळीही काही चुका झाल्या असतील त्याचा फटका निवडणुकीत बसला. हे जरी खरे असले तरी देशाला सावरण्यासाठी काँग्रेसइतका प्रागतिक पर्याय दुसरा नाही आणि येत्या काळात देशातील जनता याच विचारांच्या दिशेने जाईल, असा दावा पवार यांनी यावेळी केला.

फडणवीसांची भाषा सुधारली..
युतीच्या उमेदवाराला मतदान केले नाही तर तुमची राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांची भाषा सुधारलेली दिसते, असा टोमणा पवार यांनी यावेळी मारला. अशी भाषा वापरून आत्मविश्वास दाखविण्याचा प्रयत्न फसवा आहे, असेही ते म्हणाले. संख्याबळाचे गणित आपल्या बाजूने नसतानाही विजय कसा खेचून आणायचा यात डावखरे वाकबगार आहेत. शिवसेना-भाजपने आपल्या नगरसेवकांना गोव्याला हलविले आहे. नारायण राणे यांची कणकवली गोव्यापासून जवळ आहे याचा विसर युतीच्या नेत्यांना पडला असावा असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.