युगुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे नागरिक हैराण; गर्दुल्ले, तळीरामांचाही त्रास

ठाणेकरांना विनामूल्य शारीरिक तंदुरुस्ती राखता यावी, यासाठी ठाणे महापालिकेने शहरात ठिकठिकाणी उभारलेल्या खुल्या व्यायामशाळांना प्रेमी युगुले, गर्दुल्ले आणि मद्यपींचा विळखा पडला आहे. उपवन, सेवा रस्त्यालगतचा हरित पथ, कचराळी तलाव, वागळे इस्टेट यांसारख्या ठिकाणी उभारलेल्या खुल्या व्यायामशाळांच्या ठिकाणी प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे सुरू असतात. तसेच सायंकाळनंतर या ठिकाणी मद्यपी आणि गर्दुल्ले जागा बळकावत असल्याने सर्वसामान्य ठाणेकर हैराण झाले आहेत.

ठाण्यातील सेवा रस्त्याजवळील हरित पथ येथे खुली व्यायामशाळा आहे. या ठिकाणी सायंकाळच्या वेळी अनेक लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक येतात. मात्र येथील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे या खुल्या व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते. मात्र या अंधाराचा फायदा प्रेमी युगुले घेत आहेत. या ठिकाणी व्यायामाच्या साधनांजवळ अंधारात बसणाऱ्या प्रेमी युगुलांच्या अश्लील चाळ्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना तेथून ये-जा करणेही कठीण बनले आहे.

प्रेमी युगुलांच्या ‘कसरती’ नागरिकांना त्रासदायक ठरत असताना गर्दुल्ले आणि मद्यपीही या व्यायामशाळांच्या ठिकाणांना आपले अड्डे बनवत आहेत. सायंकाळी अंधार पडू लागल्यानंतर येथे मद्यपी तरुणांची गर्दी होते. त्यामुळे नागरिकांना व्यायाम करणे दूरच येथून चालणेही नकोसे वाटू लागले आहे.

खुल्या व्यायामशाळांची अवस्था

उपवन तलाव– या भागात सायंकाळच्या वेळेस मोठय़ा प्रमाणावर प्रेमी युगुले आपले बस्तान मांडून असतात. या ठिकाणी गणपतीचे देऊळ असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी येतात.

तसेच फिरण्यासाठी अनेक कुटुंबे या तलावाच्या सभोवताली जातात. परंतु अनेकदा या परिसरात प्रेमी युगुले हे अश्लील चाळे करताना निदर्शनास येतात. तसेच अनेक तरुण-तरुणी उघडय़ावर बसून मद्यप्राशन करतात. काही महिन्यांपूर्वी बंद झालेले दुचाकी चालकांचे स्टंट या भागात पुन्हा सुरू झाले आहेत.

कचराळी तलाव : या भागात सायंकाळच्या वेळेस मोठय़ा प्रमाणावर प्रेमी युगुले असतातच, परंतु त्याचसोबत अनेक तरुण हे मोठय़ा प्रमाणावर नशा करताना दिसून येतात. या भागात अनेक भेळवाले, फुगेवाले चालण्याच्या जागेवरच आपले ठाण मांडून बसले आहेत.

सेवा रस्ता हरित पथ : या भागात खुली व्यायामशाळा आहे. अनेक नागरिक या भागात सायंकाळच्या वेळेस व्यायाम करतात. परंतु काही दिवसांपासून या ठिकाणी असणारा पथदिवा बंद आहे. त्यामुळे अंधारात व्यायाम करणे शक्य होत नाही. तसेच हरित पथाजवळ चारचाकी आणि दुचाकी वाहने पार्क करून काही व्यक्ती मद्यपान करताना दिसून येतात.

वागळे इस्टेट परिसर : या परिसरातील अनेक भागांत अनेक कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्या बंद आहेत. या भागात मोठय़ा प्रमाणावर शुकशुकाट असतो. त्यामुळे अनेक टोळकी या भागात नशा करताना आढळून येतात. सायंकाळच्या वेळेस या परिसरात असणाऱ्या बावीस क्रमांक चौकात मोठय़ा प्रमाणावर भरधाव दुचाकी चालवतात. त्यामुळे सायंकाळी व्यायाम करणाऱ्या नागरिकांना त्रास होतो.

ठाण्यातील हरित पथ येथे मी सायंकाळी व्यायाम म्हणून चालायला जायचे. परंतु गेल्या एक महिन्यांपासून सेवा रस्ता येथील हरित पथावर सायंकाळी अनेक तरुण प्रेमी युगुले अश्लील चाळे करत असतात. या ठिकाणी खुली व्यायामशाळा आहे. परंतु या खुल्या व्यायामशाळेतसुद्धा ही जोडपी बसलेली असतात. कधी कधी काही व्यक्ती या मद्यपान करताना निदर्शनास येतात. त्यामुळे आता तिकडे फिरकावेसेही वाटत नाही.

– रेश्मा कामत, नागरिक