ठाण्यासह पालघर, रायगड जिल्ह्य़ांसाठी एकूण एक लाख ३ हजार कुप्यांची आवक

ठाणे : भारताच्या औषध महानियंत्रकांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही करोना लशीच्या मर्यादित आपत्कालीन वापरास मान्यता दिल्यानंतर लसीकरणाच्या मोहिमेकडे सर्वाचे लक्ष लागले असतानाच, ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्य़ांसाठी १ लाख ३ हजार लशीचे डोस बुधवारी पहाटे जिल्हा आरोग्य विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. या लशीच्या डोसचे महापालिकांना वितरण करण्याचेही काम सुरू झाले आहे. येत्या १६ जानेवारीपासून संपूर्ण जिल्ह्य़ात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

सीरम इन्स्टिटय़ूटने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन्ही करोना लशींच्या मर्यादित आपत्कालीन वापरास भारताच्या औषध महानियंत्रकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर करोना लशीची प्रतीक्षा संपल्यात जमा होती. तसेच देशभरात करोना लसीकरण सराव मोहीमही सुरूझाली होती. यामुळे प्रत्यक्ष लसीकरण मोहीम केव्हा सुरू होईल, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. असे असतानाच बुधवारी पहाटे सीरम इन्स्टिटय़ूटकडून ठाणे मंडळासाठी १ लाख ३ हजार लशीचे डोस

उपलब्ध झाले आहेत. ठाणे मंडळामध्ये ठाणे, पालघर आणि रायगड या तीन जिल्ह्य़ांचा समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या लशीचे तीन जिल्ह्य़ांत वितरण करण्यात येणार असून त्यामध्ये ठाणे जिल्ह्य़ाला ७४ हजार, पालघर जिल्ह्य़ाला १९ हजार आणि रायगड जिल्ह्य़ाला ९ हजार लशीचे डोस मिळणार आहेत.

जिल्ह्य़ातील महापालिकेने लाभार्थ्यांची यादी तयार करून दिली असून त्याप्रमाणे महापालिकांना लशीचा साठा दिला जाणार आहे. लशींचा साठा पोहोचविण्याचे कामही सुरू झाले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील २९ निर्देशित लसीकरण केंद्रांत लसकुप्या पोहोचवण्यात येणार आहेत. ठाणे जिल्ह्य़ाला ७४ हजार कुप्या देण्यात येणार असल्या तरी पहिल्या टप्प्यासाठी  ठाणे जिल्ह्य़ातील ६२ हजार ७५० सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झाली आहे. या सर्वाना ही लस दिली जाणार आहे, तर उर्वरित दहा टक्के लशीचा अतिरिक्त साठा असणार आहे.

दररोज १०० जणांना लस

ठाणे उपसंचालक कार्यालयातील २ ते ८ डिग्री सेल्सियस तापमान असलेल्या एका खोलीत लशीचा साठा ठेवण्यात आला आहे. शनिवार, १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होणार आहे. प्रत्येक केंद्रात दिवसाला १०० लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती उपसंचालक डॉ. गौरी राठोड यांनी दिली. ठाणे महानगरपालिकेस जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी एकूण १९००० लशीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे शनिवार, १६ जानेवारी रोजी रोझा गार्डनिया, कोरस, कळवा आणि कौसा आरोग्य केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या दिवशी ४०० लोकांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.

महापालिकेनुसार लसीचे वर्गीकरण

महापालिका                   लस

ठाणे                              १९,१००

कल्याण – डोंबिवली        ५ ,८००

नवी मुंबई                       २१,२५०

उल्हासनगर                  ५,३००

भिवंडी                          ३,३००

मिरा भाईंदर                 ८०००

देशावर करोना हे मोठे संकट आले आहे. या संकटावर मात करण्यासाठी देशातील वैज्ञानिकांनी प्रयत्न करून ही लस तयार केली आहे. कोणतीही लस किंवा औषध घेतल्यावर अनेकांना दुष्परिणाम होत असतात; परंतु, याची खबरदारी म्हणून प्रत्येक केंद्रात डॉक्टर तसेच इतर वैद्यकीय सामग्री सुसज्ज करून ठेवली आहे.

डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, ठाणे जिल्हा