थंडीचा हंगाम सुरू होण्याआधीच विदेशी पक्ष्यांचा किलबिलाट

थंडीचा हंगाम सुरू होताच अतिशीत प्रदेशातून भारतासारख्या उष्ण कटिबंधातील देशात मुक्कामाला येणारे स्थलांतरित पक्षी यंदा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच ठाणे, मुंबईतील खाडीकिनारी दाखल झाले आहेत. उत्तरेकडून आलेले फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांना आकर्षित करत असतानाच युरोप, लडाख, अमेरिका येथून मैलोन्मैल प्रवास करत पक्ष्यांचे थवेही आता लक्ष वेधून घेत आहेत. ठाणे, ऐरोली, कल्याण, भांडुप, उरणच्या खाडीकिनारी अधिवास बनवून राहिलेले हे पक्षी लवकर दाखल झाल्याने यंदा पक्षीप्रेमींना त्यांना जास्त काळ पाहता येणार आहे.

युरोपात मोठय़ा प्रमाणात थंडी सुरू झाल्यावर हे पक्षी ठाणे खाडी परिसराला काही काळ आपलेसे करतात. खाद्याच्या शोधात हजारो किमीपर्यंतचा प्रवास करत परदेशी पाहुणे ठाणे खाडी परिसराची शोभा वाढवतात. या वर्षी देखील पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली आहे. विविध बदकांच्या प्रजाती, गल्फ पक्षी, युरोपातील पाहुणे पक्षी खाडीकिनारी पाहायला मिळत आहेत.

पेंटेड स्टोर्क, स्पूनबिल्स, लेसर आणि गेट्रर सॅण्डप्लोवर, रडी टर्नस्टो, गल्स, टर्न्‍स, एशियन ओपन बिल, ब्लॅक विंग स्ट्लिट, स्नाईप, पायर्ड अ‍ॅवोकेट, स्किमर  हे पक्षी खाडी परिसरात सध्या पाहायला मिळत आहे. याशिवाय तिबेट, लडाख येथून लेसर विसलिंग डक, कॉमन टिल डक, नॉर्थन शॉवलर, स्पॉट बिल्ड डक अशा बदकांच्या वेगवेगळ्या प्रजातींनी खाडीकिनारी हजेरी लावली आहे, अशी माहिती पक्षी अभ्यासक सचिन मैन यांनी दिली.

पाहुणे पक्षी

चिखलपायटे, तुतारी, माशीमार, थिरथिरा, वटवटय़ा, वेद राघू, खाटीक, थापटय़ा (नॉर्दन शोव्हलर ), गढवाल, भिवई बदक (गारगेनि), चक्रांग (कॉमन टील) ही बदके तसेच तुतवार (सॅण्डपायपर), लाल सुरमा (रेड शॉन्क), हिरवा सुरमा (ग्रीन शॉन्क), बाकचोच तुतारी, मळगुजा (गॉडवीट)

येऊरमध्येही बहर

येऊरच्या जंगलात माशीमार पक्ष्यांच्या प्रजातीत नारंगी छातीचा माशीमार, तपकिरी माशीमार, टिकल्सचा निळा माशीमार, दलदली भोवत्या (मार्श हरिएर), शिकारी पक्ष्यांच्या प्रजातीत माँटेग्यूचा भोवत्या, हिवाळी गरुड (स्टेप इगल), मोठा ठिपक्यांचा गरुड, लहान ठिपक्यांचा गरुड आणि माळावरच्या पक्ष्यांच्या प्रजातीत साधा गप्पीदास, कवडा गप्पीदास, निळ्या शेपटीचा वेडाराघू या पक्ष्यांचा किलबिलाट आहे.

किनाऱ्यावरील पक्षी साधारणत: युरोप व अमेरिका खंडाकडून भारतात येतात. शिकारी पक्षी भारताच्या उत्तरेकडील देशातून स्थलांतर करतात आणि माशीमार हे हिमालयाच्या कुशीतून दक्षिण भारतात येतात. इतर काही पक्षी दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर करतात.

– हिमांशु टेंभेकर, पक्षी अभ्यासक

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या काळात ठाणे खाडीकिनारी परदेशी पक्ष्यांची गर्दी होत असल्याने पक्षीनिरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींसाठी कांदळवन विभागातर्फे ठाणे खाडीकिनारी दिलेली बोट सफारीची सुविधा लवकरच सुरू होणार आहे.

– विकास जगताप, जिल्हा वनअधिकारी, कांदळवन विभाग