03 August 2020

News Flash

पैशांच्या मोहा पायी महिलेचा बळी

सहा महिन्यांपूर्वीची घटना. फेब्रुवारी महिना असल्याने थंडीचे दिवस होते. बदलापूरजवळील ग्रामीण भागात व मुख्यत्वे बारवी धरण परिसरात खूप हिरवळ व जंगल असल्याने कोरडय़ा हवेमुळे बोचरी

| September 2, 2015 12:38 pm

tapaschakraसहा महिन्यांपूर्वीची घटना. फेब्रुवारी महिना असल्याने थंडीचे दिवस होते. बदलापूरजवळील ग्रामीण भागात व मुख्यत्वे बारवी धरण परिसरात खूप हिरवळ व जंगल असल्याने कोरडय़ा हवेमुळे बोचरी थंडी जाणवत होती. अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात येणाऱ्या येथील चांदप गावात सकाळच्या वेळी ग्रामस्थ लगबगीने कामाला जात होते. परंतु १२ फेब्रुवारीच्या त्या थंडगार दिवशी गावातून बाहेर पडताना जवळील जंगलात कोरडय़ा हवेबरोबर उग्र वासही येत होता. अखेर दुपारी दोनच्या सुमारास काहींना शंका आल्याने त्यांनी कुळगाव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी पाहिले असता जंगलात एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत एका नाल्याजवळ पडला होता. महिलेचा चेहरा दगडाने ठेचला असल्याने पोलिसांना मृतदेहाची ओळख पटविणे शक्य नव्हते. त्यामुळे सायंकाळी उशिरा पोलिसांनी फिर्याद दाखल केली.दुसऱ्या दिवशी पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्थानकांमधले मिसिंग रजिस्टर तपासण्यास सुरुवात केली. या तपासणीत बदलापूर शहर पश्चिम पोलीस स्थानकाच्या मिसिंग रजिस्टरमध्ये एक महिला ६ फेब्रुवारीपासून बेपत्ता असल्याचे कळून आले. कुळगाव पोलिसांनी तात्काळ त्या महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व त्यांना मृत महिलेचे प्रथम कपडे व मृतदेह दाखविण्यात आले. महिलेच्या मुलाने ही आपली आई असल्याचे पोलिसांना सांगितले. त्या मुलाला खूप धक्का बसून तो जागीच कोसळला होता. मेघना सावकारे (नाव बदलले आहे) असे त्या महिलेचे नाव असून ६ ऑक्टोबरला बदलापूर रेल्वे स्थानकात आईला सोडायला गेलो होतो, ती ठाण्याला जाणार होती, असे मुलाने पोलिसांना सांगितले. मात्र ६ तारखेला आई घरी न आल्याने ९ तारखेला हरवल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी महिलेचा मोबाइल क्रमांक मुलाकडून मिळवत फोनची माहिती तपासली. त्यात ६ तारखेला सायंकाळी एका अनोळखी क्रमांकावरून चार ते पाच वेळा फोन आल्याचे पोलिसांना आढळले. त्यांनी त्या क्रमांकाची माहिती मिळवताच तो मंगेश ठाकूर (नाव बदलले आहे) नावाच्या १७ वर्षीय तरुणाचा मोबाइल क्रमांक होता मात्र तो पोलिसांच्या हाती सापडला नाही. १९ तारखेला तो बदलापूर सोडून गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांची शंका अखेर खरी ठरत होती. या दरम्यान, मंगेश ज्यांच्या संपर्कात होता, त्यांच्या क्रमांकाची माहिती मिळवताच त्यांचे मोबाइल उत्तर प्रदेशातील स्थान दाखवत असल्याचे पोलिसांना कळून आले. मंगेशचा २० वर्षीय मित्र रमेश पवार (नाव बदलले आहे) व १७ वर्षीय परप्रांतीय मित्र संतोष यादव (नाव बदलले आहे) हे उत्तर प्रदेशात होते आणि मंगेश त्यांच्या संपर्कात होता. लागलीच पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. मात्र उत्तर प्रदेशात मोबाइलचे लोकेशन सापडल्याच्या ठिकाणी पोलिसांना कुणीच सापडले नाही आणि नंतर रमेशच्या मोबाइलचे लोकेशन मिळणेही बंद झाले होते. पोलिसांना त्यामुळे तपासात पुढे जाणे आता अवघड झाले होते.एके दिवशी अचानकच पोलिसांनी सहज रमेशचे लोकेशन तपासले असता, ते कर्नाटक-आंध्र सीमेवरील नेल्लूर जिल्ह्य़ातील एका जंगलात दिसत होते. पोलिसांनी पुन्हा त्यांचा तपास करण्याचे ठरवले व कर्नाटक-आंध्र सीमेवरील घनदाट जंगलात जाण्याचा निश्चय केला. पोलीस साध्या वेशात एका खासगी गाडीने त्या जंगलात पोहोचले. जंगलात एका मोठय़ा धरणाचे काम सुरू असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी तेथील एका ठेकेदाराला विश्वासात घेतले आणि माहिती सांगितली. ठेकेदाराने सहकार्य करण्याचे सांगून आमच्या बांधकामाच्या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी दोन कामगार महाराष्ट्रातून आल्याचे सांगितले. पोलिसांची शंका खरी ठरली, मंगेशचे मित्र रमेश व संतोष तेथेच होते. पोलिसांना ठेकेदाराने पुरवलेली एक गाडी व माणसाला घेऊन त्यांनी बांधकामाचे स्थळ गाठले. तेथील अभियंत्याला सांगून तेथे असणाऱ्या सर्व कामगारांना पोलीस असलेल्या गाडीजवळ बोलविण्यात आले. बरेच कामगार तेथे आले. मात्र दोन जण सगळ्यात मागे उभे होते. पोलीसही गाडीतून उतरलेले नव्हते. अभियंत्याला सांगून त्या दोघांना गाडीजवळ बोलवण्यात आले. ते गाडीजवळ येताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्यांना गाडीत घातले व मराठीतून संवाद सुरू केला. त्या अनोळखी घनदाट जंगलात आपल्याशी एका गाडीतून आलेली माणसे मराठीतून बोलत आहेत, हे कळल्यावर रमेश आणि संतोषच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले होते. त्यांना बदलापूरला कुळगाव पोलीस स्थानकात आणताच त्यांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली व मुख्य आरोपी मंगेश असल्याचेही सांगितले. मंगेश तोपर्यंत प्रथम नांदेड व नंतर अकोल्याला पळून गेला होता. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले व त्यानेही तेव्हा गुन्ह्याची कबुली दिली.मंगेश स्वत नळदुरुस्तीची कामे करीत होता. त्याने ३५ वर्षीय मेघना सावकारेंच्या घरी यापूर्वी नळदुरुस्तीची कामे केली होती. त्यामुळे त्यांचा मेघना यांच्याशी चांगला परिचय होता. ६ तारखेला त्याने मेघना यांना त्याचा मित्र संतोष याच्या वाढदिवशी येण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार मेघना या मंगेशचे मित्र रमेश व संतोष यांच्यासोबत निघाल्या होत्या. बारवी धरणापासून जवळ असलेल्या चांदप गावाजवळ एके ठिकाणी थांबून हा वाढदिवस साजरा करण्यात आला. तेथे दारू पिऊन तर्र झालेल्या मंगेशने दारूची बाटली मेघना यांच्या डोक्यात फोडली व त्या खाली पडल्या. त्यानंतर एक मोठा दगड तीन ते चार वेळा मेघना यांच्या डोक्यात घालून मंगेशने त्यांची निर्घृण हत्या केली व त्यांच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठय़ा, मोबाइल, तीन हजार रुपये, पर्स आदी घेतले व त्यांचा मृतदेह एका नाल्यात टाकून दिला. निव्वळ काही पैशांसाठी या अल्पवयीन मुलांनी मेघना यांची हत्या केली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2015 12:38 pm

Web Title: crime and investigation
Next Stories
1 अंबरनाथच्या समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ
2 धार्मिक पुस्तकांचा अमूल्य साठा
3 बेशिस्त नागरीकरणामुळे पर्यावरणाचा बळी
Just Now!
X