पोलिसांच्या ‘ट्वीट’मुळे गोंधळाचे वातावरण

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचे रुग्ण वाढत असल्याने महापालिका आणि पोलीस यंत्रणांनी टाळेबंदीची जोरदार तयारी सुरू केल्याने संभ्रमावस्थेत असलेल्या ठाणेकरांनी सोमवारी सायंकाळपासूनच मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. शहरात २ जुलैपासून संपूर्ण टाळेबंदी लागू केली जाईल, अशा स्वरूपाचे ट्विट ठाणे पोलिसांनी सोमवारी दुपारी केले होते. राजकीय गोंधळात हे ट्वीट रात्री मागे घेण्यात आले असले तरी कोणत्याही क्षणी नवा निर्णय जाहीर होईल या भीतीने भाजीपाला, किराणा बाजारात ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोमवारी सकाळी पोलीस आणि महापालिका प्रशासनामध्ये झालेल्या बैठकीनंतर २ ते ११ जुलैपर्यंत संपूर्ण टाळेबंदी लागू होणार असल्याचे सांगितले जात होते. ठाणे शहर पोलिसांनी त्यासंदर्भाचे ट्वीटही प्रसारित केले होते. लवकरच टाळेबंदीचे आदेश महापालिका काढणार असल्याचेही या ट्वीटमध्ये म्हटले होते. या टाळेबंदीची जोरदार तयारी महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून सुरू होती. बाजारपेठेत सध्या सम-विषम पद्धतीने दुकाने उघडी ठेवली जात आहे. टाळेबंदीचा आदेश येणार असल्याने ठाणे महापालिका आणि पोलीस प्रशासनाने बाजारपेठेतील दोन्ही दिशेकडील दुकाने पुढील दोन दिवस उघडी ठेवण्यासही मुभा दिली होती. असे असताना सोमवारी रात्री अचानक ठाण्यात टाळेबंदीचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच ठाणे पोलिसांच्या खात्यावरील ट्वीटही मागे घेण्यात आले. संपूर्ण टाळेबंदीतील गोंधळ कायम असल्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. महापालिका आणि पोलीस यंत्रणा कोणत्याही क्षणी टाळेबंदीचे वेळापत्रक जाहीर करतील या भीतीने मंगळवारी सकाळी ठाण्यातील किराणा मालाचे किरकोळ व्यापारी आणि भाजी मंडयांतील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवली. तसेच टाळेबंदीबाबत संभ्रम असल्याने सकाळी साडेसात वाजेपासून नागरिकांनी याठिकाणी वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. घोडबंदर भागातील बहुतेक परिसरात स्वयंघोषित टाळेबंदी करण्यात आलेली आहे. त्यामुळे येथील काही नागरिकांनीही ठाणे बाजारपेठेत वस्तू खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील दुकानात गर्दी झाली होती.