ठाणे : तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा सोमवारी ठाणे जिल्ह्य़ालाही बसला. वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्यामुळे अनेकठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. अशा घटनांमध्ये एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस सुरू होता. जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी खंडीत झालेला वीज पुरवठा रात्री उशीरापर्यंत सुरळीत झाला नव्हता.

जिल्हाप्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी ६ सहावाजेपर्यंत जिल्ह्य़ात सरासरी ११.५ मीमी इतका पाऊस पडला. तसेच सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे ३९१ वृक्ष उन्मळून पडले. तर, २९५ ठिकाणी वृक्षांच्या फांद्या कोसळल्या. या घटनांमध्ये १७२ ठिकाणी घरांचे तसेच बांधकामांचे नुकसान झाले.

उल्हासनगरमध्ये रिक्षावर झाड कोसळून एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी नौपाडा येथे कारवर झाड कोसळले. यात कारमधील डॉ. रितेश गायकवाड हे जखमी झाले. शिळफाटा येथेही होर्डिंग टेम्पोवर कोसळून दोनजण जखमी झाले.