30 September 2020

News Flash

दप्तर दिरंगाईमुळे दादोजी स्टेडियम बंद

क्रीडा आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभे करण्यात आलेले दादोजी कोंडदेव स्टेडियमची दारे खेळाडूंसाठीच बंद असल्याचे चित्र आहे.

पावसाळय़ानंतर खुले न झाल्याने खेळाडूंचा पायऱ्यांवर सराव
ठाणे जिल्ह्यातील क्रीडा आणि क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी उभे करण्यात आलेले दादोजी कोंडदेव स्टेडियमची दारे खेळाडूंसाठीच बंद असल्याचे चित्र आहे. पावसाळय़ाच्या निमित्ताने दरवर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सरावासाठी बंद करण्यात येणारे या स्टेडियमचे मैदान अर्धा नोव्हेंबर उलटल्यानंतरही खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे या मैदानावर सरावासाठी येणाऱ्या खेळाडूंची चांगलीच पंचाईत होत आहे. येथे नित्यनेमाने सराव करणाऱ्या व नुकताच शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झालेल्या श्रद्धा घुले हिलासुद्धा प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका बसत असून स्टेडियमच्या पायऱ्यांवर धावण्याचा सराव करून श्रद्धा स्पर्धेची तयारी करत आहे.
ठाणे जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियमचे मैदान हे सरावासाठीचे हक्काचे मैदान असते. त्यामुळे अनेक खेळाडू येथे येऊन राज्य, राष्ट्रीय  तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धासाठी सराव करत असतात. या स्टेडियमवरील मैदान पावसाळय़ाच्या चार महिन्यांत बंद ठेवण्यात येते. अन्यथा वर्षभर येथे खेळाडू सराव करताना दिसतात. मात्र, यंदा नियमानुसार मैदान खुले होण्याच्या तारखेला दीड महिना लोटूनदेखील ते बंदच आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे ही वेळ ओढवल्याचे सांगण्यात येते. दीड आठवडय़ापूर्वीच या मैदानावरील गवत काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. श्रद्धा घुले ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने स्पर्धामध्ये भाग घेत असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मात्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुकीत गर्क असलेल्या पालकमंत्र्यांना या समस्येकडे लक्ष देता आले नसल्याची चर्चा होत आहे.
दरम्यान, ‘मैदानात गवत पुन्हा लावण्यात आले आहे. तसेच खेळाडूंना इजा होऊ नये म्हणून येथील खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे.  मात्र येत्या एक- दोन दिवसांत आम्ही मैदान सुरू करू करीत आहोत,’ असे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2015 8:04 am

Web Title: dadoji stadium close
टॅग Thane
Next Stories
1 दिवाळीच्या मुहूर्तावर हजारो वाहनांची खरेदी
2 यंदाही दिवाळीत आवाज मोठ्ठा!
3 फटाके न फोडण्याचा संकल्प
Just Now!
X