ठाण्यातील वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने दैदिप्यमान थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जय जवान गोविंदा पथकाने १ मिनिटे आणि ३ सेकंदात नऊ थरांचा मनोरा रचला. दुसरीकडे ठाण्यातील नौपाडा येथे मनसेने उभारलेली हंडीमध्ये बोरीवलीच्या शिवसाई गोपाळ पथकाने फोडली. या गोविंद पथकानेही नऊ थर रचत ११ लाखांचे बक्षीस मिळवले.

ठाण्यातील टेम्बी नाका, जांभळी नाका तसेच वर्तकनगर येथील आयोजकांनी यंदाच्या उत्सवात बक्षीसाची रक्कम कमी केली होती. मनसेच्यावतीने नौपाडा येथे आयोजित केलेल्या नऊ थरांच्या हंडीसाठी ११ लाखाचं बक्षीस ठेवण्यात आले होते.  यंदा न्यायालयाने थरांच्या मर्यादेवरील निर्बंध उठवल्यानंतर कोणते गोविंदा पथक किती थर लावणार याबाबात नागरिकांमध्ये उत्सुकता होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत रंगलेल्या दहीहंडीच्या सोहळ्यात ठाणे परिसरात दोन मंडळानी नऊ थर लावल्याचे पाहायला मिळाले.

मानाच्या हंड्या रात्री उशिरा फुटणार

सकाळपासून आयोजक तसेच गोविंदा पथकांमध्ये दिसणारे निरुत्साहाचे वातावरण संध्याकाळी पूर्णपणे बदलले. संध्याकाळच्या सुमारास गोविंदा पथकांचा उत्साहात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील टेम्बी नाका येथे दिवंगत सेनेचे नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या हंडीला सलामी देण्यासाठी अनेक मंडळांनी हजेरी लावली. तर खासदार राजन विचारे यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जांभळी नाक्यावरील ‘महा’दहीहंडीसाठी देखील मुंबई आणि ठाण्यातील पथकांनी सलामी दिली. ठाण्यातील उत्सवासाठी लाल,हिरव्या ,पिवळ्या तसेच निळ्या रंगाची टी शर्ट घालून ‘बोल बजरंग बली की जय…’ अशा जयघोष करत अनेक पथके उत्सवात सहभागी झाली आहेत.

महिला गोविंदा पथकांनी ही उत्साहाने सहभाग घेतल्याचे पाहायला मिळत आहे. उत्साह वाढत असतानाच कुठलंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ठाण्यातील टेम्बी नाका आणि जांभळी नाका येथील हंड्या रात्री उशिरा फुटणार आहेत.