25 November 2017

News Flash

फुलपाखरांच्या जगात : डॅनाइड एग फ्लाय

डॅनाइड एग फ्लाय फुलपाखरांमध्ये नर आणि मादी यांची रूपे अगदी वेगळी असतात.

उदय कोतवाल | Updated: August 31, 2016 1:15 AM

डॅनाइड एग फ्लाय हे निम्फेलिडे कुळातील मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. निम्फेलिडे फुलपाखरे इतर कीटकांसारखी सहा पायावर न बसता मागच्या चार पायांवरच बसतात. पुढचे दोन पाय हे काहीसे आखूड असतात आणि त्यावर ब्रशसारखी लव असते. त्यामुळे या फुलपाखरांना ब्रश फुटेट म्हटले जाते.

डॅनाइड एग फ्लाय फुलपाखरांमध्ये नर आणि मादी यांची रूपे अगदी वेगळी असतात. माद्यांचे रूप हे प्लेन टायगर या विषारी फुलपाखरासारखे असते. अर्थात आकार मात्र लहान असतो. एखाद्या फुलपाखराने दुसऱ्या फुलपाखराचे रूप धारण करण्याला  मिमिक्री म्हणजे नक्कल करणे असे म्हणतात. असे करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश स्वत:ला भक्ष्यापासून वाचवणे हा असतो.

डॅनाइड एग फ्लाय नरांचे पंख वरच्या बाजूस गडद चॉकलेटी आणि काळ्या असतात. पुढच्या पंखांवर डोक्यापासून लांब अंतरावर एक मोठ्ठा पांढरा धब्बा असतो तर त्याच्या पलीकडे पंखांच्या वरच्या किनारीजवळ एक पांढराच पण छोटा धब्बा असतो. या धब्ब्यांवर पंखांवरच्या वाहिन्यांची काळ्या रंगांची जाळी उठून दिसते. मागच्या पंखांवर असणारा पांढरा धब्बा हा आकाराने सर्वात मोठा असतो. यावरील वाहिन्यांची नक्षी अगदी फिक्कट आणि पिवळ्या रंगाची असते. पंखांची संपूर्ण कड ही पांढऱ्या अर्धवर्तुळाकार नक्षीच्या माळेने सजलेली असते. सगळ्या पांढऱ्या डागांना गर्द निळ्या बांगडीसारखी किनार असते. मात्र विशिष्ट कोनातून बघितल्यासच ती दिसते. या पांढऱ्या अंडाकृती ठिपक्यांमुळेच या फुलपाखरांना एग फ्लाय नाव मिळाले आहे.

पुढच्या पंखांचा खालचा भाग करडय़ा तांबूस रंगाचा असून वरची बाजू ही चमकदार रंगाची असते. डोक्याकडली पंखांची कड काळ्या रंगाची असते आणि त्यावर तीन पांढरे ठिपके असतात. पंखाच्या मध्यावर आरपार असा उभा पांढरा धब्बा असतो. त्याच्या पलीकडे पंखाच्या टोकावर पांढरा लहान डाग असतो. या दोन्ही पांढऱ्या डागांची जागा ही पंखांच्या वरच्या बाजूस असणाऱ्या डागांचीच असते. त्याला निळी किनार मात्र नसते. शिवाय पंखांच्या कडांना पांढरे बारीक ठिपके असतात.  मागच्या पंखांची खालची बाजू करडय़ा तांबूस रंगांची असते. पंखांची कड पांढऱ्या, तुटक रेषांची  असते. त्याच्या आत आधी काळ्या रंगाचे मोठे ठिपके असतात आणि त्या नंतर पांढरे बारीक ठिपके असतात. पंखांच्या मध्यभागी मोठा पांढरा पट्टा असतो.

मादी फुलपाखराच्या पुढच्या पंखांची वरची बाजू पिवळसर तपकिरी रंगाची असते, पण जवळपास अर्धे पंख आणि कड काळ्या रंगाची असते. पंखांच्या टोकांना या काळ्या रंगांवर पांढऱ्या रंगांच्या मोठय़ा आणि छोटय़ा ठिपक्यांची एक एक रांग असते. मागचे पंखही पिवळसर तपकिरी रंगाचे असून कड काळ्या रंगाची असते. त्यांचे हे रूप प्लेन टायगर या विषारी फुलपाखरासारखे असते.

ही फुलपाखरे पाणथळ जागांपासून वर्षांवने, ओसाड शुष्क माळ अशा सर्व ठिकाणी राहू शकतात. त्यामुळेच अमेरिकेचे दोन्ही खंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आशिया एवढय़ा मोठय़ा भूभागात सापडतात.

आपल्याकडे मिळणाऱ्या घोळ, तरवड, फुडगूस अशा झाडांवर मादी अंडी घालते. फुलपाखराची वाढ पूर्ण होण्यास साधारण पंधरा दिवस लागतात, तर या फुलपाखराचे पूर्ण आयुष्य हे एक महिन्याचे असते.

First Published on August 31, 2016 1:15 am

Web Title: danaid eggfly