|| पूर्वा साडविलकर

नियमित वर्ग बंद करावे लागल्याने संस्थांची शक्कल

ठाणे : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी टाळण्याचे आवाहन केले असताना शाळा, महाविद्यालये आणि नाटय़गृहांना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पेचात पडलेल्या नृत्य आणि संगीताचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी थेट ऑनलाइनचा मार्ग निवडला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन माध्यमातून धडे गिरवता येऊ लागल्याने विद्यार्थ्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

‘करोना’चा प्रसार रोखण्यासाठी सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच सर्व शिक्षण संस्थांनाही सुट्टय़ा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार नृत्य, संगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी हे प्रशिक्षण वर्ग बंद केले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात खंड पडू नये यासाठी या संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना घरबसल्या प्रशिक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. ठाण्यातील एस. के. डान्स स्टुडिओमध्ये दररोज एक तास विद्यार्थ्यांना नृत्याचे प्रशिक्षण देण्यात येत होते. परंतु करोना विषाणूच्या पाश्र्वभूमी हे प्रशिक्षण वर्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. हे वर्ग बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात खंड पडण्याची शक्यता आहे. या स्टुडिओचे प्रमुख प्रदीप सौदे यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना यूटय़ूब वाहिनीच्या माध्यमातून दररोज एक तास प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संगीताचे प्रशिक्षण देणारे फर्टाडोस स्कूल ऑफ म्युझिक यांनीदेखील त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेत स्थळाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना लाइव्ह दररोज एक तास प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या तनुजा गोम्स यांनी दिली आहे. तसेच काही संस्थांकडून ऑनलाइन प्रशिक्षणाचे अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे.

कट्टय़ांचे उपक्रम ऑनलाइन

ठाण्यातील वाचक कट्टा, अभिनय कट्टा तसेच संगीत कट्टय़ाचा आनंद रसिकांना घरबसल्यादेखील घेता यावा यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन व्हिडीओ दर आठवडय़ाला प्रसारित करण्यात येणार आहे. या कट्टय़ाचे सादरीकरणातील कलाकार कट्टय़ावर येऊन आपली कला सादर करतील व त्याचा व्हिडीओ संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी अपलोड केला जाणार आहे.

ऑनलाइन कार्यक्रमांची रेलचेल

गुढीपाडव्यानिमित्त विविध शहरांतून निघणाऱ्या स्वागतयात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, शहरातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता यावा, यासाठी ठाणे शहरातील अजेय संस्थेतर्फे ऑनलाइन गुढीपाडवा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी ७ ते दुपारी १ वाजता काव्यमैफीलचे तर, दुपारी १ ते रात्री ८ या वेळेत लेखांचा पाडवा हे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम संस्थेने तयार केलेल्या शतकोटी रसिक संकेतस्थळावर प्रसारित करण्यात आला आहे.