वसई-विरारमध्ये १९८ इमारती जीर्णावस्थेत; पावसाळ्यापूर्वी कारवाई करण्याचा पालिकेचा दावा

वसई-विरार महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये तब्बल ५७९ इमारती धोकादायक असून त्यापैकी १९८ इमारती जीर्णावस्थेत आहेत. पावसाळ्यापूर्वी वसई-विरार महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली. पावसाळ्याअगोदर या इमारतींचा सव्‍‌र्हे करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

वसई-विरार महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस धोकादायक इमारतींची संख्या वाढत चालली आहे. धोकादायक इमारतींमुळे रहिवाशांना दुर्घटनेला सामोरे जावे लागू नये म्हणून अशा इमारतींचा सव्‍‌र्हे करून त्यानंतर त्याची यादी दरवर्षी तयार केली जाते. अशा इमारती रिकाम्या करण्यासंदर्भात पालिकेकडून नोटिसा बजावल्या जातात, पंरतु रहिवासी बऱ्याचदा घरे खाली करण्यास तयार होत नाहीत. पावसाळ्यात अशा इमारतींमध्ये जीवितहानी आणि मालमत्तेची हानी लक्षात घेता आता वसई-विरार महापालिका इमारतींचा सव्‍‌र्हे करणार असून त्यानंतर या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे.

दरवर्षी पावसाळ्याआधी वसई-विरार पालिका प्रशासन मोहीम सुरू करून धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना घर रिकामे करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र पालिकेच्या या पवित्र्यामुळे धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशांची पंचायत होते. दुसरे घर घेण्याची ऐपत नसल्यामुळे आणि समाधानकारक पर्याय नसल्याने जायचे तरी कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. धोकादायक इमारतींमधून बाहेर काढण्यात येणाऱ्या रहिवाशांची पर्यायी सोय महापालिकेकडून करण्यात येत नाही. ट्रान्झिस्ट कॅम्पसारख्या पर्यायी निवाऱ्याचीही सोय नसल्याने या इमारती रिकाम्या होतच नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्ये भर पडत चालली आहे. अशामध्ये संक्रमण शिबिराची (ट्रान्झिस्ट कॅम्प) गरज असल्याचे नालासोपारा येथील स्थानिक उमेश तिवारी यांनी सांगितले.

अतिधोकादायक, धोकादायक तसेच अन्य इमारतींचे सर्वेक्षण सुरू असून या इमारतींना नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. पाहणी करून अतिधोकादायक इमारती निष्कासित करण्यात येतील.

राजेंद्र लाड, अभियंता, वसई-विरार महापालिका