भाईंदर पूर्वेकडील ठाकरे मैदानात तीन महिने उलटूनही काम सुरूच

भाईंदर : करोनाकाळात तातडीने उपचाराकरिता उभारण्यात आलेले भाईंदर पूर्व भागातील बाळासाहेब ठाकरे मैदानात कोविड रुग्णालयाचे अजूनही काम पूर्ण न झाल्याने अद्यापही ह्य रुग्णालयाचा वापर करण्यात आलेला नाही. सध्या शहरातील कोविड रुग्णांची संख्या कमी होऊन इतर कोविड रुग्णालय मोकळी असताना अद्यापही पालिकेच्या कोविड रुग्णालयाचे काम सुरू आहे. रुग्णालयाचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून लवकरच ते वापरात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी सांगितले.

सुरुवातीच्या काळात मीरा-भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत होती. त्यामुळे अधिकाधिक करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्याकरिता पालिकेमार्फत तातडीने कोविड रुग्णालय आणि कोविड केंद्राची निर्मिती करण्यात आली. पालिकेला राज्य शासनाकडून सहकार्य म्हणून मीना ताई ठाकरे आणि प्रमोद महाजन सभागृहात कोविड केंद्र उभारण्यात आले. त्याच प्रकारे बाळासाहेब ठाकरे मैदानात तात्पुरत्या कोविड रुग्णालयाच्या निर्मितीस मान्यता देऊन सुमारे १२ कोटीची निविदा काढण्यात आली. त्यानुसार  तीन महिन्यांपासून या रुग्णालयाच्या निर्मितीचे कामच सुरू आहे.

महापालिकेकडे करोना उपचारासाठी १०४३ खाटांची बंदिस्त ठिकाणी व्यवस्था आहे. तर लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांसाठी कोविड काळजी केंद्र म्हणून १८१६ लोकांची क्षमतेच्या स्वतंत्र सदनिका आहेत. अलगीकरणासाठी देखील २१८६ सदनिका उपलब्ध आहेत. याशिवाय खाजगी विकासकांनी ज्या ७ इमारती पालिकेला करोनाग्रस्त वा अलगीकरणातील नागरिकांसाठी देऊ केल्या आहेत. त्यातदेखील सुमारे २ हजार लोकांना ठेवता येईल इतकी क्षमता आहे. त्यामुळे शहरात इतक्य मोठय़ा प्रमाणात जागा उपलब्ध असताना प्रशासनामार्फत कोटय़वधी रुपये खर्च करून रुग्णालय तयार करण्यात येत असल्यामुळे विरोध करण्यात येत आहे. हे रुग्णालय केवळ  कंत्राटदाराला आर्थिक फायदा करण्याकरिता तयार करण्यात येत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मोईन सय्यद यांनी केला आहे.