आर्थिक घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप; मैदान ताब्यात घेण्याची मागणी

ठाण्यातील नौपाडा भागातील महापालिकेचे घंटाळी मैदान आणि त्यामधील खुला रंगमंच शिवसेनेच्या माजी नगरसेवकाशी संबंधित संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेवकांनी यात आर्थिक घोटाळ्याचा आरोप केला. मैदान ताब्यात घेण्याची मागणी करत भाजपने सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या संस्थेने मात्र आरोप फेटाळून लावले आहेत.

निविदा प्रक्रियेविनाच ही वास्तु संबंधित संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली असून या संस्थेकडून प्रदर्शने आयोजित करून मैदान आणि रंगमंचचा व्यावसायिक वापर होत आहे. या व्यवहारांची कोणतीही नोंद संस्थेकडून ठेवली जात नाही आणि महापालिकेचे भाडेही संस्था भरत नाही, अशी टीका भाजपचे नगरसेवक सुनेश जोशी यांनी केली.

शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास सामंत यांच्याशी संबंधित असलेल्या संस्थेला पालिकेने ही वास्तू चालविण्यासाठी दिली आहे.  मैदानाच्या करारासंदर्भात जोशी यांनी प्रशासनाला काही प्रश्न विचारले होते. शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नांची उत्तरे देताना निविदेविनाच मैदान चालविण्यासाठी दिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. संस्था भाडेही भरत नाही, व्यवहारांच्या नोंदीही नाहीत. त्यामुळे वास्तु ताब्यात घेण्यात यावी, अशी मागणीही जोशी यांनी केली. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये जुंपल्याचे चित्र होते.

कौशल्य रुग्णालयही चौकशी?

ठाणे येथील पाचपखाडी भागातील भूखंड कौशल्य रुग्णालयाला ९९ वर्षांच्या करारावर देण्यात आला आहे. या रुग्णालयासोबत केलेल्या करारामध्ये बाजारभावानुसार भाडे आकारणे, सामजिक आणि कौटुंबिक आरोग्य विषयक कार्यक्रम राबविणे अशा अटींचा समावेश होता. याबाबत नगरसेवक नारायण पवार यांनी प्रश्न विचारले असता, प्रशासनाला त्यांची उत्तरे देता आली नाहीत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी रुग्णालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत समिती नेमून चौकशीची मागणी केली. त्यावर नगरसेवकांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे अटी आणि शर्तीचा भंग झाला आहे की नाही, याचा अहवाल सादर करण्याच्या आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय चौकशी चक्रात सापडण्याची चिन्हे आहेत.

पालिकेने २००१ मध्ये शहरातील वास्तु विनानिविदा दिल्या होत्या. त्यामध्ये आम्हाला घंटाळीची वास्तु दिली. आम्ही वेळेवर भाडे भरत असून संस्थेचे तीनदा लेखापरीक्षण झाले आहे. त्यात गैरव्यवहार आढळलेला नाही. करारानुसारच आम्ही काम करतो. संस्थेवर आकसापोटी खोटे आरोप केले जात आहेत.

– विलास सामंत, अध्यक्ष, घंटाळी प्रबोधनी