शाळेतला पहिला दिवस गोड करण्यासाठी विविध उपक्रम

ठाणे : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंद असतोच. मात्र तरीही अनेक विद्यार्थ्यांमध्ये या दिवसाबाबत धास्ती, कंटाळाही असतो. त्यामुळेच शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय आणि आनंददायी करण्यासाठी ठाणे आणि आसपासच्या शहरांतील शाळा व्यवस्थापनांनी सोमवारी विविध उपक्रम राबवले. कुठे ढोलताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात होते, तर कुठे झाडांची रोपटी देऊन मुलांना पर्यावरण रक्षणाचे धडे दिले जात होते. काही शाळांत तर रॅपगीत सादर करून विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्याचाही प्रयत्न झाला.

शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळांनी विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वागत वेगळ्या पद्धतीने केले आहे. ठाण्यातील काही शाळांमध्ये सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले होते. या सेल्फी पॉइंटवर ‘माझा शाळेचा पहिला दिवस’ असे लिहिण्यात आले होते. विद्यार्थी सेल्फी पॉइंट चेहऱ्यासमोर धरून पालकांकडून छायाचित्र काढून घेत होते. शाळेत प्रथमच पाऊल टाकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाताचे ठसे एका कागदावर घेऊन पालकांनी त्या कागदावर अपेक्षित अभिप्राय लिहून शिक्षकांजवळ सुपूर्द केला. सरस्वती मंदिर शाळेतील मराठी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागातर्फे सकाळच्या सत्रात शिक्षकांनी जमिनीवर चांदणीचे आकार काढून त्यांना हसरी आणि रडकी चांदणी अशी नावे दिली होती. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करताना कोणत्या चांदणीत जायचे आहे, असे विचारण्यात आले. साहजिकच अनेक विद्यार्थानी हसऱ्या चांदणीची निवड केली.

कुंडी म्हणजे शाळा, माती म्हणजे पालक आणि वृक्षांची फुले म्हणजे मुले असा संदेश देण्यासाठी काही शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी मिळून कागदापासून वृक्षाची प्रतिकृती तयार केली. काही शाळांमध्ये ‘आनंदी ठेवू मुले’ असा संदेश असणारे बॅच विद्यार्थ्यांना देण्यात आले.    बहुतेक शाळांत मुलांना चॉकलेट, बिस्किटे, फुले, पाठय़पुस्तके देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. काही शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. लोकमान्यनगर येथील राज ठाकू र विद्या मंदिर शाळेच्या लहान शिशू ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गाण्याच्या भेंडय़ा, मामाचे पत्र हरवले आणि एखादा विषय देऊन अभिनय करणे असे उपक्रम आयोजित करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रोपटय़ांचे वाटप करण्यात आले, असे राज ठाकूर शाळेचे शिक्षक सुनील चव्हाण यांनी सांगितले.

अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटी संचलित समग्र विकास गुरुकुल द्वारा विजयाताई आठल्ये प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशा वाजवून करण्यात आले. तसेच शाळेतील काही मुलांनी मल्लखांब दिवसाच्या निमित्ताने प्रात्यक्षिके सादर केली.

पहिल्या दिवशी होमहवन

अंबरनाथ येथील दी एज्युकेशन सोसायटी संचलित द्वारा विजयाताई आठल्ये प्राथमिक शाळेत पालक आणि विद्यार्थी यांच्यातर्फे शाळेच्या परिसरात वातावरणशुद्धीसाठी होमहवन करण्यात आले. याप्रसंगी तूप, समीधा, तीळ, शेणी आणि कापूर हे पदार्थ अर्पण करण्यात आले. या पदार्थामुळे शाळेचे वातावरण शुद्ध होण्यास मदत होते, असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना जावणे यांनी सांगितले.

शाळेतील पहिला दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विविध उपक्रमांच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यातील शाळेचा पहिला दिवस स्मरणात राहील. 

– गंधारी विरकर, शिक्षिका, सरस्वती मंदिर पूर्व प्राथमिक विभाग