tvlogभावाबहिण्याच्या पवित्र नात्याला अधिक घट्ट करणारा धागा म्हणजे ‘राखी’. खास रक्षाबंधनाचे औचित्य साधून लेडिज नेटवर्क वेल्फेअर असोसिएशनतर्फे रंक्षाबंधन विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये आकर्षक राख्या, रक्षाबंधननिमित्त भाऊ-बहिणीसाठी खास भेटवस्तू, गृहपयोगी वस्तू व इतर अन्य वस्तूही येथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वसंतराव नाईक सभागृह, शिवकृपा प्रिमायसेस, बी केबीन, नौपाडा, ठाणे(प.) येथे सकाळी १०.३० ते रात्री ८.३० यावेळेत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.
* कधी- शुक्रवार, २८ ऑगस्ट
* कुठे- वसंतराव नाईक सभागृह, शिवकृपा प्रिमायसेस, बी केबीन, नौपाडा, ठाणे(प.), वेळ-सकाळी १०.३० ते रात्री ८.३०
साडय़ांचे प्रदर्शन
महिला आणि साडय़ा म्हणजे अगदी ‘एक दुजे के लिये’.. जणू एकमेकांसाठी बनलेल्या..त्यांच्यात एक अतूट नाते असते. त्यामुळे महिलांचा उत्साह साडय़ांच्या दुकानात अक्षरश: ओसंडून वाहत असतो. जणू काही वेळही तिथे पूर्णत: थांबून जातो. त्यातही ‘सिल्क’च्या साडय़ा त्यांना विशेष प्रिय असतात. सध्या ठाणे शहरामध्ये अशाच प्रकारच्या सिल्क साडयांचे प्रदर्शन भरले आहे. या प्रदर्शनामध्ये बिहारी नैसर्गिक तस्सर स्लिक, कर्नाटक मधील गाररोटी स्लिक, अरीनी सिल्क, तसेच आंध्रप्रदेशामधील धरमावरा, उपडा, गडवाल, मंगलागिरी, पोचंपाली सिल्क आणि महाराष्ट्रातील पैठणी, पंजाबमधील पटीयाला प्रकार या प्रदर्शनामध्ये पहायला मिळणार आहे.  हे प्रदर्शन सध्या सुरू असून रविवार, ३० ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
’स्थळ : हॉटेल टीप-टॉप प्लाझा, चेक नाक्याजवळ, लालबहादुर शास्त्री मार्ग, ठाणे
’वेळ : सकाळी ११ ते रात्री ९.००
दागिन्यांची आरास
आपले सौंदर्य खुलविण्यासाठी दागदागिने घालून सजणे हे मानवजातीला फार पुरातन काळापासून ठाऊक आहे. महिलांना फुलांच्या माळा, हार, गजरे यांपासून ते सोने, चांदी, रुपे, मोती, पोवळे, हिरे आणि आता प्लॅटिनम या सर्वापासून बनविलेले दागिने घालून मिरवायला मनापासून आवडते. महाराष्ट्रातील महिलांनी नथ व पुरुषांची भिकबाळी हे अगदी वेगळे असे दागिने आहेत. याशिवाय बोरमाळ, कोल्हापुरी साज, ठुशी, तन्मणी, चपलाहार, चिंचपेटी अशी यादी खूप मोठी आहे. महाराष्ट्रातील या दागदागिन्यांची ओळख करून देणारे एक प्रदर्शन कल्याणमध्ये आयोजित केले जाणार आहे. पारंपरिक दागिन्यांपासून ते आधुनिक  दागिन्यांमधील विविध कलाकुसरी या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाहता येतील.
’कधी- शुक्रवार, २८ ऑगस्ट
’कुठे- गीता हॉल, कृष्णा टॉकीज समोर, टायटन शोरुमजवळ, शिवाजी चौक. कल्याण(प.)
एक मुलाकात
सुप्रसिद्ध कवी साहीर लुधियानी आणि अमृता प्रीतम यांच्या नात्यावर आधारित दर्जेदार नाटय़विष्कार ठाणेकरांना अनुभवता येणार आहे. सुम्मना एहमद व सैफ हैदर हसन लिखीत सैफ हैदर हसन दिग्दर्शित ‘एक मुलाकात’ या दर्जेदार नाटकाचा प्रयोग काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात शुक्रवारी होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते शेखर सुमन व दिप्ती नवल यांच्या भूमिका आहेत.
’कधी- शुक्रवार, २८ ऑगस्ट
’कुठे- काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.), वेळ- रात्री ८.३०
असा बनतो केक
अनेक खवय्ये मंडळींना गोड पदार्थ खाण्याची आणि ते बनवण्याची आवड असते. या गोड पदार्थातील केक बर्थडे किंवा पाटर्य़ामध्ये आवर्जून खाल्ला जाणारा केक  नेमका बनवतात कसा? केक कसा सजवण्यात येतो?  खाल्ल्यावर लगेचच तोंडात विरघळणारा आईसक्रिम केक, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे केक बनवण्याची कार्यशाळा कॉरम मॉलमध्ये ‘वुमन ऑन वेनस्डे’ उपक्रमात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेच्या अंतर्गत महिलांना या दिवशी मॉलमधील काही दुकानांमध्ये वस्तूंवर सूट मिळणार आहे.
’कधी : बुधवार, २ सप्टेंबर
’कुठे :  कोरम मॉल, वेळ : २ ते ४
नृत्यनम: नृत्याविष्कार
विशाखा नृत्यालयाच्या वतीने २२ व्या वार्षिक महोत्सवानिमित्त ‘नृत्यनम:’ या नृत्याविष्काराचे आयोजन केले आहे. गुरु ज्योती शिधये आणि विशाखा नृत्यालयाच्या विद्यार्थीनींचा यामध्ये सहभाग असणार आहे. ‘ए-री माई’ व ‘आम्रपाली’ या नृत्यनाटीकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. स्वप्नील भिसे, मनोज देसाई, अपर्णा फडके, पराग पुजारे, पुजा शेडे आदी कलाकार यामध्ये सहभाग घेणार आहेत.  ’कधी-रविवार, ३० ऑगस्ट
’कुठे- सावित्रीबाई फुले रंगमंदिर, डोंबिवली (पू) वेळ-सकाळी १०.३०
रुपेरी वाळूत
मराठी भावसंगीत तसेच चित्रपट संगीतात अनिल मोहिले आणि अरूण पौडवाल या जोडीने दिलेल्या रचनांना विशेष स्थान आहे. आजही इतक्या वर्षांनंतर त्यांच्या गाण्यांची लोकप्रियता टिकून आहे. अतिशय सुरेल गीते देणाऱ्या अनिल-अरुण या संगीतकार द्वयीच्या रचनांवर आधारित ‘रुपेरी वाळूत’ ही गाण्यांची मैफल पोटरेमेंटो इव्हेंट्स आणि अनंत तरे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल, कविता पौडवाल. आदित्य पौडवाल, शेखर महामुनी, आणि रविंद्र खोमण आदी गायक कलावंत ही गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता गडकरी रंगायतन येथे हा कार्यक्रम होणार आहे. विनामुल्य प्रवेशिका नाटय़गृहावर उपलब्ध आहेत.
’कधी-शुक्रवार, २८ ऑगस्ट रोजी
’कुठे- गडकरी रंगायतन, ठाणे(प.), वेळ- रात्री ८.००
गाणी अंतरंगातली
मन, डोळे आणि हृदय यावर आधारित गाण्यांचा एक तरल संगीतानुभ देणारा कार्यक्रम रघुलीला इंटरप्रायइझेस संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. गायक हृषिकेश अभ्यंकर, केतकी भावे-जोशी, धनंजय म्हसकर, गायत्री शिधये या कार्यक्रमात गाणार आहेत तर निवेदन मयुरेश साने करणार आहे.
’कधी – शनिवार २९ ऑगस्ट
’कुठे – शुभमंगल हॉल, डोंबिवली पूर्व, वेळ – सायंकाळी ६.३० वाजता.
कपडय़ांचा बाजार..
खरेदी करणे हा पूर्वी महिलांचा जन्मसिद्ध हक्क मानला जात असे. मात्र आता पुरुषही यामध्ये त्यांना स्पर्धा करू लागले आहेत. ठाण्यामधील सेलिब्रेशन सभागृह, पाचपाखाडी येथे थेट उद्योजक ते ग्राहक अशा संकल्पनेतून भव्य ग्राहक पेठेचे आयोजन करण्यत आले आहे. सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान ही ग्राहक पेठ सर्वासाठी खुली राहणार आहे.  जिन्स, कार्गो, कॉटन ट्राऊझर, टी-शर्ट आदी कपडय़ांचे विविध प्रकार यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
’कुठे- सेलिब्रेशन हॉल, सर्विस रोड, पाचपाखाडी, ठाणे(प.)
’कधी- दररोज सकाळी १० ते रात्री ९
सुधीर फडके लघुपटाचे सादरीकरण
मराठी मनावर फार मोठा प्रभाव असणारे सुप्रसिद्ध संगीतकार-गायक सुधीर फडके यांच्या कारकिर्दीवर आधारित दोन तास तीस मिनिटे कालावधीच्या लघुपटाचे सादरीकरण सुवर्ण अंबर संगीत संघ या संस्थेच्या वतीने रविवार ३० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ वाजता ब्राह्मण सभेचे दत्त मंदिर सभागृह, वडवली, अंबरनाथ (पूर्व) येथे केले जाणार आहे.
पावसाची बंदिश
श्रावण सुरू असला तरी पाऊस मनासारखा बरसत नाही. मनात मात्र सतत पावसाची रिमझिम सुरू आहे. अशा या वातावरणात पावसाचा मनमुराद आनंद देणाऱ्या बंदिशींची मैफल कल्याण गायन समाजाच्या वतीने आयोजित केली आहे. ‘बरखॉं की ऋत आई’ असे या कार्यक्रमाचे नाव असून वर्षां ऋतुचे वर्णन करणाऱ्या बंदीशींचे सादरीकरण  केले जाणार आहे. मनिषा घारपुरे यांची ही संकल्पना असून पल्लवी जोशी, मानस विश्वरूप, मनिषा घारपुरे यावेळी गायन करणार आहेत.
’कधी – रविवार, ३० ऑगस्ट
’कुठे – पांडुरंग-प्रभा सभागृह, कल्याण गायन समाज, टिळक चौक, कल्याण (प.) वेळ – सायंकाळी ५ वाजता.