News Flash

कर्णकर्कश आवाजाने ‘डीजे’च बधीर

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणावरील र्निबध न्यायालयाच्या आदेशाने कडक करण्यात आले

कर्णकर्कश आवाजाने ‘डीजे’च बधीर

दहा वर्षांत तरुणांच्या कानांच्या तक्रारींत वाढ

मोठय़ा, दणदणाटी आवाजाच्या तालावर साऱ्यांनाच थिरकायला लावणारे ‘डीजे’ आता स्वत:च आपल्या व्यवसायाचे शिकार होऊ लागले आहेत. विविध पबमध्ये संगीताची बाजू सांभाळणाऱ्या डीजे कर्मचाऱ्यांमध्ये कानांच्या विकारांत वाढत होत असल्याचे डॉक्टरांच्या निरीक्षणात उघड झाले आहे. एकूणच, कानात मोठमोठाले हेडफोन लावून मोठय़ा आवाजात गाणी ऐकणाऱ्या तरुणवर्गात आता कर्णबधिरतेचे प्रमाण वाढत असल्याचेही पाहणीतून पुढे आले आहे.

सार्वजनिक ठिकाणी ध्वनिप्रदूषणावरील र्निबध न्यायालयाच्या आदेशाने कडक करण्यात आले असले तरी, पब, आलिशान हॉटेल, बार येथे बंदिस्त दालनात डीजेचा दणदणाट सुरूच आहे. या ठिकाणी जाणाऱ्या तरुणवर्गात कानांच्या विकारासह मोठय़ा आवाजामुळे आरोग्याच्या अन्य तक्रारीही वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, असे संगीत हाताळणाऱ्या ‘डीजे’ कर्मचाऱ्यांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. प्रत्येक पबमध्ये डीजे बॉय आणि डीजे गर्ल असतात. हे कर्मचारी तासन्तास दणदणाटी आवाजाच्या सान्निध्यात असतात. त्यामुळे त्यांना कर्णबधिरतेचा धोका अधिक असतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

सर्वसामान्य व्यक्ती ७० डेसिबलपर्यंत आवाज सहन करू शकते. मात्र पबमध्ये आवाजाची पातळी सामान्य आवाजापेक्षा दहापटीने वाढलेली असते. डीजे व्यवसायात आणि पब्जमध्ये काम करणारे कर्मचारी दररोज सरासरी सात ते आठ तास मोठय़ा पातळीच्या आवाजाच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांना कानाच्या समस्या उद्भवत असल्याचे ठाण्यातील कान, नाक, घसा तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप उप्पल यांनी सांगितले. तसेच या पबच्या आधीन झालेले तरुण, सतत कानांमध्ये संगीत यंत्र लावून गाणी ऐकणाऱ्या वीस ते पस्तीस वयोगटातील तरुणांमध्ये कानांच्या तक्रारी गेल्या दहा वर्षांपासून वाढत असल्याचे निरीक्षण डॉ. उप्पल यांनी नोंदविले.

वाढत्या तक्रारी

  • भ्रमणध्वनीवर नीट ऐकू न येणे.
  • कानात शीळ वाजणे.
  • कान सुन्न होणे.
  • अचानक मोठा आवाज कानात झाल्याने पडदा फाटणे.

नेमके काय होते?

हेडफोनवरील संगीत ऐकताना आवाज कानांच्या पडद्यापासून अगदी जवळ असतो. परिणामी कानांमधील स्नायू आकुंचन पावतात. अशा सततच्या संगीतश्रवणामुळे कानांची नस कायमस्वरूपी कमकुवत बनते. अशीच स्थिती पबसारख्या बंदिस्त ठिकाणी नियमितपणे दणदणाटी आवाजाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांच्या बाबतीत उद्भवते.

पाश्चिमात्य देशात ध्वनीविषयक पूरक कायदे अस्तित्वात आहेत. मोठय़ा आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने तीन आठवडय़ांनंतर कमी आवाजाच्या ठिकाणी पाठवण्यात येते. असे केल्याने कानांच्या बाबतीत असलेली ‘रिव्हर्सिबल चेंज’ या संकल्पनेनुसार कानाला काही त्रास उद्भवल्यास त्याचे निराकरण करता येते. भारतात ध्वनीविषयक अशा स्वरूपाचे कायदे नसल्याने रोज तासन्तास मोठय़ा आवाजात काम करणाऱ्या व्यवसायातील तरुणांना कायमची कर्णबधिरता येते.

डॉ. अमोल खळे, कान-नाक-घसातज्ज्ञ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 1:55 am

Web Title: dj sound issue 2
Next Stories
1 पालिकेची रात्रकारवाई
2 लोकलदारी महिला प्रवाशांची बसकण
3 पूल खुला, कोंडी कायम!
Just Now!
X