पूर्वा साडविलकर

‘भैय्या मेरे, राखी के बंधन को निभाना’, ‘मेरा भाई’, ‘भाई-बहन का प्यार’ अशी अक्षरे साकारलेल्या पारंपरिक राख्यांना यंदा व्यवसाय, नोकरी, उद्योग, कला या क्षेत्रांशी संबंधित नावांच्या राख्यांची जोड मिळू लागली आहे. भाऊरायाचे ‘करिअर’ दर्शवणाऱ्या ‘डॉक्टर भाई’, इंजिनीअर भाई, सीए भाई, बॉडी बिल्डर भाई, बिझनेसवाला भाई अशा भावाच्या व्यवसायाशी जोडलेल्या राख्यांचा नवा ट्रेंड बाजारपेठेत पाहायला मिळत आहे.

राखी पौर्णिमेला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शहरातील बाजारपेठा राख्यांच्या दुकानांनी सजलेल्या पाहायला मिळत आहेत. पारंपरिक गोंडय़ाच्या राख्यांपासून ते नव्या विविध ट्रेंडी राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. यामध्ये भावाच्या स्वभावाला अनुसरून स्वभावाचे वर्णन करणारी राखी विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. या राख्यांवर शेअरिंगवाला भाई, केअरिंगवाला भाई, स्वॅगवाला भाई, मुडी भाई असे लिहिलेले पाहायला मिळते. तर दुसरीकडे भावाच्या व्यावसायिक क्षेत्राला अनुसरून तयार करण्यात आलेल्या राख्यांनाही मोठी मागणी असल्याचे राखी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. यामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, सीए, बिझनेसवाला यांसारख्या विविध क्षेत्रांची छाप राख्यांवर दिसून येते. या एका राखीची किंमत ५० रुपये असून दिवसाला अशा २० ते २५ राख्यांची विक्री होत असल्याचे राखी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. लहान मुलांच्या आवडत्या डोरेमॉन, शिनचान, छोटा भीम आणि मोटू पतलू या कार्टूनमधील पात्रांचे चित्र असणाऱ्या राख्या विकत घेण्याकडेही अनेकांचा कल आहे.

 टीशर्टनाही मागणी

‘किंग’ आणि ‘क्वीन’, ‘प्रिन्स आणि प्रिन्सेस’ यासारखे टीशर्ट प्रेमीयुगुलांसाठी बाजारात उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे यंदाच्या रक्षाबंधनला भाऊ  आणि बहिणीचे प्रेम व्यक्त करणारे टीशर्ट समाजमाध्यमांवर विक्रीसाठी आले आहेत. बहीण-भावाचा स्वभाव स्पष्ट करणारा संदेश या टीशर्टवर लिहिलेले आहेत. ‘माय सिस्टर माय एन्जल’, ‘माय ब्रदर माय हिरो’, ‘नो सिस्टर नो भेजा फ्राय’, नो ब्रदर नो भेजा फ्राय, त्याचबरोबर ‘फुलो का तारोंका सबका कहना है, एक हजारोंमें मेरी बहना है,  या गाण्यांचे टीशर्टही संकेतस्थळांद्वारे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

ऑनलाइन राखी खरेदीला मागणी

विविध प्रकारच्या हव्या त्या आकारांतल्या आणि रंगांतल्या राख्या ऑनलाइन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरही विक्रीसाठी उपल्बध आहेत. अनेकदा दूरवर राहत असल्याने बहीण आणि भावाची भेट होत नाही अशा वेळेस ऑनलाइन संकेतस्थळावरूनच राखी निवडून ती हळदी-कुंकू आणि तांदूळ या औक्षणाच्या सामग्रीसह इच्छित स्थळी पाठवणे सोपे जात असल्याचे ग्राहकांनी सांगितले.

राख्यांवर भावाच्या व्यवसायाचे नाव असल्यामुळे या राख्या ग्राहकांना आकर्षित करीत आहेत. त्यामुळे बाजारात सध्या या राख्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे.

– शुभम राणे, राखी विक्रेते, ठाणे</p>