मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अपघात करणाऱ्या वाहनचालकांचे भांडण सोडवण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला चालकाच्या हल्ल्याला सामोरे जावे लागल्याची घटना शनिवारी रात्री १२ वाजता ठाण्यातील घोडबंदर रोडवर घडली. पोलिसावर हल्ला करत त्याच्या उजव्या हाताच्या मनगटाचा चावा घेण्याचा प्रताप मद्यप्राशन केलेल्या चालकाने केला. अभिराम चौहान असे या मद्यपी चालकाचे नाव असून त्याच्यावर कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

शनिवारी रात्री बाराच्या सुमारास रिक्षाचालक अजय चतुर्वेदी व कारचालक अभिराम चौहान व त्याचा साथीदार समाधान हे एकमेकाची गाडी धडकल्यामुळे वाद घालत होते. यावेळी कर्तव्यावर असलेले जगन्नाथ कोळी हे पोलीस शिपाई वाद सोडविण्यासाठी तेथे गेले. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्या, असे कोळी यांनी सांगितले असता चौहान व त्याच्या साथीदाराने कोळी यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. चौहानने कोळी यांच्या उजव्या हाताच्या मनगटाचा कडकडून चावा घेत पळ काढला.