किन्नरी जाधव

त्वचा विकार, कावीळ, पोटाच्या आजारांत वाढ

प्रदूषण हवेतील दमटपणा, उघडय़ावर पडलेला कचरा याचा प्रतिकूल परिणाम ठाण्यातील श्वानांच्या आरोग्यावर होत आहे. गेल्या तीन महिन्यांत ठाणे आणि आसपासच्या परिसरांतून श्वानांच्या त्वचाविकारांत वाढ झाल्याच्या तक्रारी येत आहेत. दोन वर्षांपासून कावीळ आणि त्वचाविकारांत वाढ झाल्याचे पशुवैद्यांनी सांगितले.

गेल्या दोन महिन्यांत डोंबिवली, ठाणे परिसरातील ११४ श्वान आजारी पडल्याची नोंद ‘व्हेटरनरी प्रॅक्टिशनर वेल्फेअर असोसिएशन’कडे करण्यात आली आहे. यात पावसाळ्यात होण्याऱ्या त्वचाविकारांचे प्रमाण जास्त असून हवेतील प्रदूषण व दमट हवेचा जास्त दुष्परिणाम जाणवत असल्याचे निरीक्षण संस्थेच्या वैद्यांनी नोंदवले आहे.

प्रदूषणामुळे त्वचाविकारांत आणि हवेतील ओलावा, दूषित पाणी यामुळे कावीळ, पोटाचे विकार, गोचडय़ा यांसारख्या आजारांत वाढ झाल्याचे ‘व्हेटरनरी प्रॅक्टिशनर वेल्फेअर असोसिएशन’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गोचडय़ांमुळे ताप, संसर्ग, केस गळणे, लेप्टोस्पायरोसिस, पोटात जंतुसंसर्ग आणि श्वसनाच्या रोगांमध्ये वाढ होत आहे. या आजारांचे प्रमाण भारतीय प्रजातींच्या श्वानांपेक्षा परदेशी प्रजातींच्या श्वानांमध्ये जास्त आहे.

काही प्रजातींच्या श्वानांची पिल्ले अगदी कमी वयातच श्वानपालकांना विकण्यात येतात. साधारण दोन महिन्यांपर्यंत पिल्लांना आईचे दूध मिळाल्यास प्रतिकार क्षमता वाढून पिल्ले आजारांपासून सुरक्षित राहण्यास मदत होते. कमी वयात विकल्या जाणाऱ्या पिल्लांना आईचे दूध न मिळाल्याने औषधोपचार करूनही ते दगावण्याची भीती असते, असे पशुवैद्य डॉ. रोहित गायकवाड यांनी सांगितले.

पुढील काही महिन्यांत प्रदूषण वाढल्यास आजारी श्वानांचा आकडा वाढण्याची भीती पशुवैद्यांकडून व्यक्त केली जात आहे. दमट हवेचा, प्रदूषणाचा फटका लॅबरेडॉर, पोमेरिअन, जर्मन शेफर्ड, पग यांसारख्या परदेशी श्वानांना बसत असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

श्वासोच्छ्वासास त्रास होणे, उलटय़ा होणे, ओठ पांढरे होणे, जीभ लाल होणे, हृदयाचे ठोके वाढणे, फीट किंवा चक्कर येणे यांसारखी लक्षणे श्वानांमध्ये अधिक प्रमाणात आढळत असल्याचे ‘व्हेटरनरी प्रॅक्टिशनर वेलफेअर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉ. मनोहर अकोले यांनी सांगितले.

काळजी कशी घ्यावी?

* घरातील पाळीव प्राण्यांना सतत पंख्याखाली, मोकळ्या हवेत ठेवणे उत्तम ठरते. रस्त्यावरील श्वानांना एखाद्या झाडाखाली सावलीच्या ठिकाणी ठेवावे.

* आंघोळीसाठी जंतुनाशक, शाम्पू, साबणाचा उपयोग करावा. कडुनिंबाची पाने गरम पाण्यात भिजवून त्या पाण्याने शरीर स्वच्छ करणे.

* स्वच्छ, भरपूर पाणी द्यावे.

* पोटातील जंतावर नियमितपणे औषध द्यावे

* श्वानांचे केस कापावेत.