आनंदनगर नाका परिसरात टीएमटी बसचे चार्जिग स्थानक उभारण्याचा विचार; बसच्या वर्दळीचा कोपरी पुलावर भार वाढण्याची शक्यता

मुंब्रा बाह्यवळण रस्ता खुला झाल्यानंतर ठाणे शहरातील कोंडी कमी होईल, या आशेने दिवस ढकलत असलेल्या वाहनचालकांना येत्या काही महिन्यांत आणखी कोंडीला तोंड द्यावे लागणार आहे. रुंदीकरणाच्या कामामुळे कोपरी पूल मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची भीती असतानाच याच परिसरात ठाणे परिवहन उपक्रमाच्या (टीएमटी) विद्युत बसगाडय़ांसाठी चार्जिग स्थानक उभारण्यात आले आहे. आनंदनगर जकात नाक्याजवळ उभारण्यात आलेले हे केंद्र सुरू झाल्यास, चार्जिगसाठी येणाऱ्या बसगाडय़ांचा सर्व भार कोपरी पुलावर येऊन येथील वाहतुकीचा बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत.

‘टीएमटी’ प्रशासनाने विजेवर चालणाऱ्या १०० बसगाडय़ा सेवेत आणण्याचा निर्णय घेतला असून यापैकी एक बस रस्त्यावर धावू लागली आहे. येत्या जूनपर्यंत उर्वरित बस टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या ताफ्यात दाखल होतील. या बसगाडय़ांच्या चार्जिगसाठी आनंदनगर येथे स्थानक उभारण्यात आले आहे. या चार्जिग स्थानकाच्या दिशेने येजा करण्यासाठी बसगाडय़ांचा मार्ग मुंबई-नाशिक महामार्गावरील अरुंद कोपरी पुलावरूनच राहणार आहे. मुंब्रा बाह्य़वळण रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वीपासून या पुलावर कोंडी होत आहे. त्यात या पुलाच्या रुंदीकरणाचे कामही वेगाने सुरू होत आहे. या कामामुळे येत्या काही महिन्यांत आणखी कोंडी वाढणार आहे. १ ऑक्टोबरपासून ठाण्यातील विविध भागांमध्ये मेट्रोची कामे सुरू होणार आहेत. या कामाचा अधिक भार घोडबंदर मार्गावर असणार असला, तरी कोपरी पुलाची कोंडी आणि पुढे घोडबंदरचे दुखणे असा दुहेरी त्रास ठाणेकरांना होण्याची चिन्हे आहेत. असे असतानाच आनंदनगर चार्जिग स्थानकात जाण्यासाठी कोपरी पुलावरून मोठय़ा बसेस येजा करू लागल्या तर कोंडी आणखी वाढेल, अशी भीती आहे.

घोडबंदर भागात जागेचा शोध

विजेवर धावणाऱ्या १५ बसगाडय़ा एकावेळी चार्ज करता येतील, इतकी क्षमता आनंदनगरमधील स्थानकात आहे. त्यामुळे शंभर बसगाडय़ांसाठी हे स्थानक पुरेसे नसल्याने पालिकेकडून शहराच्या अन्य भागातही असे स्थानक उभारले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. या स्थानकांच्या उभारणीसाठी पालिकेने संबंधित ठेकेदाराला काही जागांची यादी दिली आहे. एकाच ठिकाणी स्थानक उभारल्यास बसगाडय़ांचे चांगले नियोजन करणे शक्य होणार असल्याचा ठेकेदाराचा दावा आहे. या स्थानकासाठी दहा एकर जागा अपेक्षित असल्यामुळे मानपाडा भागातील जागा सुचविली आहे. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही जागा अद्याप निश्चित झालेली नाही. चार्जिग स्थानक उभारण्यासाठी एक महिन्याचा कालावधी जातो, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.

कोपरी पुलाच्या कामादरम्यान विजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांमुळे वाहतूक कोंडी होणार असेल, तर शहरातील परिवहनच्या अन्य जागा स्थानकासाठी निश्चित करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

मुलुंड टोलनाका आणि कोपरी पुलामुळे आधीच ठाणेकर कोंडीत सापडत आहेत. कोपरी पूल आणि मेट्रोच्या कामामुळे ही परिस्थिती अधिक भयावह होण्याची चिन्हे आहेत. असे असताना या भागात बसगाडय़ांचे चार्जिग केंद्र उभारणे, हे अत्यंत चुकीचे आहे. या प्रस्तावास शिवसेनेचा विरोध असून गायमुख किंवा अन्य भागात असे स्थानक उभे करा, अशी मागणी आम्ही केली आहे.

– नरेश म्हस्के, सभागृह नेता, ठामपा