कचराभूमी आगीला कटाचा धूर
उत्तन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील कचऱ्याला वांरवार आग लागत आहे. मात्र रविवारी दुपारी लागलेली आग ही कुणीतरी जाणूनबुजून लावली आहे, असा दावा मीरा-भाईंदर महापालिका प्रशासनाने केला आहे. या आगीमुळे प्रचंड धूर निर्माण झाला आणि स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. पण ही आग लावण्यात आली असल्याने महापालिकेने सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
उत्तन येथील धावगीच्या डोंगरावर असलेल्या घनकचरा प्रकल्पात उघडय़ावर साठविण्यात येणाऱ्या कचऱ्याला रविवारी दुपारी मोठी आग लागली. या आगीने निर्माण झालेल्या धुरामुळे उत्तन व आसपासच्या गावातील रहिवाशांना मळमळणे, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु सोमवारीदेखील हा कचरा धुमसतच होता. परंतु कचऱ्याला लागलेली ही आग लागली नसून ही आग जाणूनबुजून लावण्यात आली असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी कचऱ्याच्या ढिगाला खालच्या बाजूने आग लावली. याठिकाणी असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या ही बाब ध्यानात आली, मात्र तोर्पयच आग लावणारे पळून गेले, अशी माहिती आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. या अज्ञात व्यक्तींच्या विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून बंद असल्याने दररोज निर्माण होणारा कचरा उघडय़ावर साठवला जात आहे. कचरा साठवण्याची जागा उंचावर असल्याने या कचऱ्यातून निघणारे दूषित पाणी शेतात पसरून शेतजमीन नापीक होत असल्याचा तसेच धुरामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप करून ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली. लवादाने कचरा प्रकल्प वसई येथे स्थलांतरित करण्याचे आदेश दिले, परंतु वसई येथील सरकारी जागा अद्याप महापालिकेच्या नावे झालेली नाही, तसेच सकवार येथील स्थानिकांनीही कचरा प्रकल्प स्थलांतरित करण्यास विरोध केला आहे. त्यामुळे प्रकल्प स्थलांतराची कार्यवाही अद्यापी सुरू झालेली नाही. सद्य:स्थितीत धावगी येथे कचऱ्याचे डोंगर निर्माण झाले आहेत. या कचऱ्याला वारंवार आग लागण्याचे प्रकार होत असतात.

रसायनांची नियमित फवारणी
कचऱ्याला आग लागू नये म्हणून आयआयटीच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मीरा-भाईंदर महापालिकेला दिले होते. त्यानुसार आयआयटीने कचऱ्यावर मॅग्नेशियम क्लोराइड हे रसायन फवारण्याचा सल्ला दिला आहे. कचऱ्यातील घातक रासायनिक घटकांमुळे मिथेन वायू तयार होऊन तो पेट घेतो. मॅग्नेशियम क्लोराइड मिथेन वायूला अटकाव करत असल्याने कचऱ्याला आग लागत नाही. गेल्या काही महिन्यांपासून महापालिका नियमितपणे मॅग्नेशियम क्लोराइडची फवारणी कचऱ्यावर करत असल्याने कचऱ्याला आग लागणे बंद झाले आहे. त्यामुळे रविवारी लागलेली आग स्वत:हून लागणे शक्य नसून या कचऱ्याला मुद्दाम आग लावण्यात आली असल्याचा दावा उपायुक्त पानपट्टे यांनी केला आहे. काही अनोळखी व्यक्ती कचऱ्याला आग लावत असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांनी पाहिले असून, आग लावणाऱ्या या अज्ञात व्यक्तींवर उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात येणार असल्याचे पानपट्टे यांनी सांगितले.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे