कुळगाव-बदलापूर व अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक यावर्षीच्या एप्रिल महिन्यात पार पडली असून या निवडणुकीचे मतमोजणी केंद्र हे अनुक्रमे बदलापूर पूर्वेकडील आदर्श विद्यामंदिर शाळा व अंबरनाथमधील महात्मा गांधी शाळेत होते. या शाळांतील निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया संपल्यावर प्रत्येक शाळेच्या एका वर्गात हे सामान ठेवण्यात आले होते. परंतु चार महिने होऊनही हे सामान प्रशासनाने हलवले नसून शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांना हे वर्ग वापरता येत नसल्याने दोन्ही शाळांनी पालिका व जिल्हा प्रशासनाला याबाबत पत्रे पाठवली आहेत. मात्र प्रशासनाने अद्याप कार्यवाही न केल्याने शाळा व्यवस्थापन हतबल झाले आहे.
बदलापूरच्या शाळेतील साहित्य नेण्यासाठी आदर्श विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष तुषार आपटे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना गेल्या चार महिन्यांत तीनवेळा पत्र व्यवहार केला असून, मुरबाड तहसील कार्यालयातही पत्र पाठवले आहे. तरी अद्यापही हे साहित्य हटविण्यात आले नाही.
अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी शाळेत दहावीच्या दोन वर्गात मतमोजणी प्रक्रियेचे मतपेटय़ा आदी सामान ठेवण्यात आले असून, हे सामान अद्याप हटविण्यात आलेले नाही. यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालय व अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे शाळेने पत्रव्यवहार केला असला तरी शाळेला प्रतिसाद मिळालेला नाही. काही विद्यार्थ्यांना शाळेच्या गच्चीवर जाऊन बसावे लागत आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका पूनम कोठारी यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिसाद नाही
आदर्श विद्या प्रसारक संस्थेने १७ जुलैला या संदर्भात ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्र पाठवले असून २८ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात हे पत्र पोहचल्याची पोचही मिळाली आहे. मात्र यास एक महिना झाला तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे निवडणूक साहित्य हटवण्याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
– तुषार आपटे,
अध्यक्ष, आदर्श विद्या प्रसारक संस्था