कल्याणकरांसाठी प्रचाराची डोकेदुखी, ध्वनिप्रदूषणातही वाढ
शेकडो कार्यकर्त्यांसह प्रभागात आणि मुख्य रस्त्यावरून निघालेल्या प्रचार मिरवणुका.. उमेदवारांच्या ठिकठिकाणी होणाऱ्या सभा आणि त्या माध्यमातून होणारा राजकीय शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचा रविवार कोंडीमय ठरला. या मिरवणुका काढत असताना ढोल-ताशांचा अनावश्यक असा गजर जागोजागी सुरू असल्याचे चित्र होते. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या पातळीनेही टोक गाठल्याचे चित्र होते. कल्याण शहरातील महत्त्वाचा आग्रा रोड, मुरबाड रोड, संतोषी माता रोड, तर पूर्वेतील पुणे लिंक रोड, काटेमानवली रोड आणि अन्य अंतर्गत रस्त्यांवर निघालेल्या या मिरवणुकांनी शहरवासीयांच्या वाटा अडवून धरल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आमराई येथील सभा भर चौकात आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी अभुतपूर्व अशी कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते. वाहतूक पोलिसांची ही कोंडी सोडविताना मोठी दमछाक होत होती.
अरुंद रस्ते, रस्त्यावरील खड्डे आणि अतिक्रमणांमुळे कल्याण-डोंबिवली शहरांतील रस्त्यांवर प्रवास करताना वाहतूक कोंडीचा नित्यनियमाने सामान करावा लागतो. असे असताना निवडणुकीनिमित्त सुरू असलेल्या मिरवणुकांमुळे सर्व प्रमुख रस्ते रविवारी सायंकाळी अडविले गेले होते. कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या रस्त्यांवर उमेदवारांकडून काढण्यात आलेल्या प्रचार मिरवणुकांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा उभा राहिला. कल्याण पूर्वेतील परिस्थिती अधिकच बिकट बनली होती. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दीने भरले जाणारे रस्ते रिक्षा, वाहने यांच्यासह मिरवणुकांच्या गर्दीने भरले होते. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फटका सहन करावा लागला. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष अशा सगळ्याच मंडळींचा यामध्ये भर होता. भाजपकडून सुरू असलेल्या पथनाटय़ाचा प्रयोग ऐन रस्त्यात रंगला होता आणि त्यातच दुसऱ्या पक्षाची मिरवणूक आल्याने कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

वाहतूक कोंडी नाही..
कल्याण-डोंबिवलीमध्ये प्रचारामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीविषयी कल्याण वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस आयुक्त सयाजी डुबल यांच्याकडे विचारणा केली असता शहरात वाहतूक कोंडी झाली नसल्याचा दावा केला. वाहतूक कर्मचारी मोठय़ा प्रमाणात शहरात कार्यरत असल्याने कोणत्याही प्रकारची कोंडी शहरामध्ये झाली नसल्याचे ते म्हणाले.

आमराई परिसरातील नागरिकांची कोंडी..
एरवी विरळ गर्दीचा परिसर असलेल्या आमराई भागामध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या भागातील रहिवाशांच्या येण्या-जाण्याचा हा मुख्य रस्ता आहे. या सभेसाठी सायंकाळी सहानंतर हा भाग गर्दीने ओसांडून वाहत होता. त्यामुळे कार्यालयातून घरी जाण्यासाठीचा रस्ता या सभेमुळे बंद झाला होता.