वेळीअवेळी वीज खंडित होण्यामुळे विद्यार्थी हतबल

शहर नियोजनाच्या बाबतीत कायमचीच बोंब असलेल्या लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट परिसरात विजेच्या लपंडावाचे सत्र कायम आहे. ऐन परीक्षांच्या काळात दिवसातून दोन वेळा अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने विद्यार्थी हतबल आहेत. वीजपुरवठा खंडित करण्याचे कोणतेही वेळापत्रक अद्याप महावितरण मंडळाकडून जाहीर करण्यात आले नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशीच परिस्थिती दिवा, मुंब्रा या उपनगरांत असून डोंबिवली शहरातही मंगळवारी दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

ठाणे शहरातील वीज वितरण करण्यात महावितरणला नेहमीच अपयश आले आहे. दिवा, मुंब्रा या भागांत वीजचोऱ्यांचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी असतानाही महावितरणकडून याबाबत प्रभावी कारवाई करण्यात आलेली नाही. याचा परिणाम एकूणच ठाण्याच्या वीजपुरवठय़ावर होऊ लागला आहे. लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, सावरकरनगर या भागांत गेल्या दोन दिवसांपासून वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होत आहे. सकाळी आणि सायंकाळी कोणत्याही वेळी वीज गायब होत असल्याने नागरिकांचे उकाडय़ाने हाल होत आहेत. याचा सर्वाधिक फटका शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना होत आहे. सध्या अनेक शाळा-महाविद्यालयांत परीक्षा असून विद्यार्थ्यांना उकाडय़ात बसून अभ्यास करण्याशिवाय पर्यायच उरत नाही, असे लोकमान्य नगरमध्ये राहणारी सारा गोरडे हिने सांगितले. सायंकाळी वीजपुरवठा खंडित झाल्यास अभ्यासच करता येत नसल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. लोकमान्य नगर, सावरकनगर भागात मुख्य यंत्रणेकडून ट्रान्सफॉर्मरकडे येणारा वीजपुरवठा खंडित झाल्यावर या परिसरातील नागरिकांना त्याचा फटका बसतो. भारनियमनाचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही, असे महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या लोकमान्यनगर परिमंडळाचे विजय मंत्री यांनी सांगितले.

दिवा आणि मुंब्रा येथे एप्रिलपासूनच वीज जाण्यास सुरुवात झाली आहे. दररोज दिवसातून ७-८ तास वीज नसते. मार्च महिन्यातील थकबाकी वसुली करताना महावितरणने नागरिकांच्या घरातील वस्तू उचलून नेल्या होत्या. मात्र, आता वीजपुरवठा खंडित होत असताना महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची तक्रार रहिवासी विजय भोईर यांनी दिली.

उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे एकूणच वीज वापर वाढला आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येऊ शकतो. ग्राहकांना काही अडचण असल्यास महावितरणच्या १८००-२३३-३४३५, १८००-२००-३४३५ आणि १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.    -विश्वजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विद्युत महामंडळ.