ठाणे : ठाणे-बेलापूर उन्नत मार्गातील अतिशय महत्त्वाचा असलेला ऐरोली काटई मार्गाच्या मुंब्य्राकडील भुयारी मार्गाच्या कामाला गुरुवारी सुरुवात झाली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रकल्पामुळे शिळफाटा मार्गावरील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते डोंबिवली हे अंतर अवघ्या १५ मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

सध्या ऐरोली ते मुंब्रा हा सुमारे दोन किमीचा बोगदा तयार करण्यात येत असून या कामाला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. कल्याण डोंबिवली भागात लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे वाहनांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रस्ते मार्गांची गरज ओळखून हा प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ऐरोली-काटई मार्गातील बोगदा

या भुयारी मार्गाची लांबी १.६८ किलोमीटर इतकी असून प्रत्येकी तीन-तीन असा सहापदरी हा मार्ग असणार आहेत. याशिवाय या भुयारी मार्गिकेतील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी सीसीटिव्ही यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणादेखील असणार आहे. भुयारी मार्गाचे काम येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्यात येणार आहे.