नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

ठाणे : ठाणे बाजारपेठेत दुकाने आणि ग्राहकांकडून रस्त्याकडेला उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे पोलिसांनी या भागात सम-विषमचा पार्किंगचा मार्ग खुला केला आहे. दोन दिवसांपासून हे बदल लागू करण्यात आले आहेत. कोर्टनाका, जांभळीनाका, टेंभीनाका परिसरात सम-विषम वाहन तळ राबविण्यात आल्याने येथील वाहतूक कोंडीला आळा बसू शकेल, असा दावा केला जात असून या बदलांचे नेमके परिणाम काय होत आहेत यावर वाहतूक विभाग नजर ठेवून आहे. दरम्यान, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली, जाईल असा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

घोडबंदर, कळवा, उथळसर येथून ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी कोर्टनाका, जांभळीनाका, टेंभीनाका हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच या भागांमध्ये सरकारी कार्यालये आहेत. ठाणे महापालिका परिवहन विभागाच्या टीएमटी बसगाडय़ाही याच मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येत असतात. हा मार्ग अरुंद असल्याने तसेच बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांकडून आणि येथील दुकानदारांकडून दुकानांच्या समोरच बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करण्यात येत असतात. त्यामुळे दररोज खासगी वाहने आणि टीएमटी बसगाडय़ांना अडकून राहावे लागते. अनेकदा एखादे वाहन कोर्टनाका बाजारपेठेत बंद पडल्यास वाहनांच्या लांब रांगा लागतात. या वाहतूक कोंडीपासून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी ठाणे पोलिसांनी या भागात खरेदीसाठी किंवा कामानिमित्त येणाऱ्या वाहन चालक आणि दुकानदारांची वाहने उभी करण्यासाठी सम-विषम पर्याय पुढे आणला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा प्रयोग ठाणे वाहतूक पोलिसांनी सुरू केला असून त्याचा चांगला परिणाम दिसू लागला असल्याची माहिती

वाहतूक पोलिसांनी दिली. हा प्रयोग ३० दिवसांच्या प्रायोगिक तत्त्वावर लागू असून हरकती मागविण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

पार्किंगचे नवे नियम

*  कोर्टनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जांभळीनाक्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावरील विषम तारखेस डाव्या बाजूस तर, सम तारखेस उजव्या बाजूला सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत आणि दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत विरुद्ध बाजूस वाहने उभी करण्यास मुभा देण्यात आली आहे.

* टेंभीनाका चौकापासून ते जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर विषम तारखेस डाव्या बाजूला आणि सम तारखेस उजव्या बाजूला सकाळी ८ आणि दुपारी २ तसेच दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत उजव्या बाजूस हे बदल असणार आहे.

कोर्टनाका, टेंभीनाका आणि जांभळीनाका भागात सरकारी कार्यालये आहेत. मात्र, येथे येणाऱ्या वाहन चालकांकडून चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केली जात होती. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. त्याचा परिणाम सर्व टीएमटी आणि खासगी वाहनचालकांना सहन करावा लागत होता. त्यामुळे सम विषमचे पर्याय या मार्गावर सुरू करण्यात आले आहेत.

– अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.