वझे केळकरच्या प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांचे उपयुक्त संशोधन
महाविद्यालयात असणाऱ्या प्रयोगशाळांचा उपयोग फक्त विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांकडून केला जात असला तरी तिथे होणाऱ्या विविध प्रयोगांचे आकर्षण वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांनाही असते. वझे केळकर महाविद्यालय कला आणि वाणिज्य शाखेसोबतच विज्ञान शाखेसाठी येथे उपलब्ध असलेल्या अद्ययावत साधनसामग्रीसाठी प्रसिद्ध आहे. महाविद्यालयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तीन महत्त्वपूर्ण विषयांच्या प्रयोगशाळांबरोबर जैव तंत्रज्ञान, कोस्मेटॉलॉजीसाठी विशेष प्रयोगशाळा आणि वैज्ञानिक संशोधन केंद्र आहे. भौतिकशास्त्र विषयासाठी आधुनिक साधनसामग्रीने युक्त अशा दोन प्रयोगशाळा आहेत. त्यात कनिष्ठ महाविद्यालयाचे व वरिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रात्यक्षिक करू शकतात.

महत्त्वपूर्ण संशोधनाची जोड
महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये हरित रसायनशास्त्रामध्ये धोकादायक रसायने न वापरता पर्यावरणस्नेही द्रावणे किंवा द्रावणविरहित रासायनिक अभिक्रिया वापरण्याविषयी संशोधन सुरूआहे. तसेच रसायनशास्त्र विभागातील डॉ. लक्ष्मी रविशंकर यांना आय.एन.एस.ए व मुंबई विद्यापीठाकडून सवरेत्कृष्ट शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये रसायनशास्त्राविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी ‘वझे केमिका’ नावाची पुस्तिकासुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे. जीवशास्त्रासाठी वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र अशा पाच प्रयोगशाळा आहेत. यात प्लॅंट टिश्यू कल्चर, अ‍ॅनिमल टिश्यू कल्चर व मोलिक्यूलर बायोलॉजी च्या प्रात्यक्षिकांद्वारे आत्मसात केले जातात. या प्रयोगशाळेमध्ये ‘हरीत निरी’ जातीचे शेवाळ, जे खूप थंड व खूप ऊन असलेल्या भागात राहू शकते आणि ज्यातून अन्न नसलेल्या भागात अन्नसुद्धा तयार करू शकतो, अशा शेवाळाच्या प्रजातीचे पुनरुज्जीवन सुरूआहे. अशा तीन प्रयोगशाळांसोबत वझे महाविद्यालयाचे वैशिष्टय़ असलेल्या जैवतंत्रज्ञान, कॉस्मेटॉलॉजी प्रयोगशाळा व वैज्ञानिक संशोधन केंद्रात संशोधन करणारे विद्यार्थी प्रात्यक्षिके करतात. तसेच येथे शेवाळ हे वाहनातून किवा कंपनीतील चिमणीमधून बाहेर पडणारा कार्बन डाय-ऑक्साईड कसा शोषून घेतो, यावर संशोधन सुरू आहे. कॉस्मेटॉलॉजी विभागात परफ्युमरी, कोस्माटिक, पर्सनल केअर अशा चार प्रयोगशाळा आहेत. परफ्युमरी प्रयोगशाळेत परफ्युमच्या गंधावरून विद्यार्थ्यांना शिकवले जाते. सायंटिफिकरिसर्च सेंटरमध्ये औद्योगिक व शेतीविषयक गोष्टींची मायक्रोबियल टेस्टिंग केली जाते तसेच टिश्यू कल्चर पद्धतीने एकपेशीय सूक्ष्मजीव मारणारा रोप तयार केला जातो.

प्रकाश प्रकल्पांसाठी स्वतंत्र डार्करूम
प्रकाश विषयासंबंधित प्रयोग करण्यासाठी विशेष डार्करूम व विज्ञान पदव्युत्तर आणि डॉक्टरेटसाठी वेगळी संशोधन प्रयोगशाळा आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणारी वर्षभराचे प्रयोग असलेली छापील पुस्तिका व प्रयोगाचा सराव करण्यासाठी वारंवार उपलब्ध करून दिली जाणारी प्रयोगशाळा हेच वैशिष्टय़ म्हणता येईल.
रसायनशास्त्र विषयासाठी वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय, इन्स्ट्रूमेन्टेशन रूम अशा एकूण सहा प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये सेफ्टी शॉवर, आय वॉश, महानगर गॅसची जोडणी आणि सोबत विशेष अ‍ॅसिड रूम आहे.

आंतरराष्ट्रीय तरुण वैज्ञानिक म्हणून निवड
प्रतिनिधी, ठाणे<br />बा.ना.बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात तृतीय वर्ष जैवतंत्रज्ञान विभागात शिकत असलेल्या चिन्मयी शुक्ल आणि आदित्य छत्रे या विद्यार्थ्यांची डेन्मार्क येथे आंतरराष्ट्रीय तरुण वैज्ञानिक म्हणून निवड करण्यात आली होती. डेन्मार्क येथे नुकत्याच झालेल्या ‘डॅनिश यंग सायंटिस्ट केअर अँड कॉन्टेस्टमध्ये’ या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व केले. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘बायोडिग्रॅडेशन ऑफ लॉ डेन्सिटी पॉलिथेलिन प्लास्टिक’ या विषयावर आपला पेपर सादर केला. बांदोडकर महाविद्यालयात राबवण्यात येणाऱ्या मिनी रिसर्च प्रकल्पाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी डॉ. कल्पिता मुळे आणि प्रा. जयश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दीड वर्षे प्लास्टिक विघटन प्रक्रिया यावर काम केले आहे. महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड होणे ही महाविद्यालयासाठी आनंदाची बाब आहे, असे प्रभारी प्राचार्य डॉ. मनोहर न्यायते यांनी व्यक्त केले.
पेंढरकर महाविद्यालयात नॅनो तंत्रज्ञान प्रयोगशाळा
प्रतिनिधी, डोंबिवली
महाविद्यालयीन जगात प्रवेश केल्यानंतर प्रयोगशाळेचा वापर केवळ विज्ञान शाखेच्या मुलांकडून होतो. विज्ञान शाखेतील विद्यार्थी येथे विविध प्रयोग करतात. त्यांना या प्रयोगशाळेचे जेवढे आकर्षण असते, त्याहून अधिकआकर्षण कला आणि वाणिज्य शाखेच्या मुलांना असते. डोंबिवली हे शहर शैक्षणिकदृष्टय़ाही आता प्रगल्भ होत असल्याने येथील विद्यार्थ्यांना डोंबिवलीतच सर्व सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात,त्यांना मुंबईला जावे लागू नये म्हणून येथील के.व्ही.पेंढरकर महाविद्यालय प्रयत्न करीत आहे.
या महाविद्यालयाने केवळ शिक्षणाच्या बाबतीत नाही, तर कला, क्रीडा, साहित्य आदी सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा सर्व सोयीसुविधा महाविद्यालयात देऊ केल्या आहेत. त्यातीलच एक सुविधा म्हणजे प्रयोगशाळा. तेव्हापासून या महाविद्यालयाने विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेची सुविधा देऊ केली आहे. महाविद्यालयात केमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर सायन्स या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे. अद्ययावत हवेशीर व आधुनिक साधनसामग्रीने युक्त अशा या प्रयोगशाळेत ज्युनिअर कॉलेजच्या मुलांसोबत एम.एस्सी व पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांसाठीही ही प्रयोगशाळा उपयुक्त आहे.

नॅनो टेक्नॉलॉजी लॅब
भविष्यात नॅनो टेक्नॉलॉजी या क्षेत्राला फार मोठे महत्त्व प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना या क्षेत्रातही बारावीनंतर उत्तम करिअर करण्याची संधी प्राप्त होईल. गेल्या वर्षी महाविद्यालयाच्या वतीने नॅनो टेक्नॉलॉजी लॅब सुरू करण्यात आली आहे. पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या लॅबचा उपयोग होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सोयी सुविधांचे काम सध्या सुरूआहे. सोबतच कॉम्प्युटर सायन्स व आयटी लॅबची सुविधाही महाविद्यालयात उपलब्ध आहे.
नेरुरकर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
सिद्धी बोबडे, युवा वार्ताहर
महाविद्यालयीन आयुष्य हे फुलपाखरासारखे स्वच्छंदी असते. या काळात वर्गातील तासिका टाळून कॅन्टिनमध्ये मारलेल्या गप्पा, पाहिलेले चित्रपट, मित्रांसमवेत केलेली धमाल आठवणींच्या रूपात पुढे आयुष्यभर सोबत करीत असतात. त्या अनुभवांचा पुनर्प्रत्यय घेण्यासाठी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित केले जातात. डोंबिवलीतील नेरुरकर महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनीही महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवानिमित्त महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देण्याच्या हेतूने माजी विद्यार्थ्यांचे संमेलन भरविले.
साने गुरुजी सेवा मंडळाच्या ज्ञानदानाच्या कामाची चढती कमान म्हणजे रा.वि.नेरूरकर कनिष्ठ महाविद्यालय. या कनिष्ठ महाविद्यालयाची सुरुवात २७ जुलै, १९९२ रोजी झाली. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत अनेक होतकरू विद्यार्थी निर्माण करून या कनिष्ठ महाविद्यालयाने हे व्रत अखंड सुरू ठेवले आहे. या रौप्य महोत्सवी वर्षांची सुरुवात माजी विद्यार्थी संघाच्या स्थापनेने झाली. २४ एप्रिल रोजी सकाळी महाविद्यालयाचे पटांगणात सानेगुरुजी सेवा मंडळाचे संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांनी उत्साहाने हजेरी लावली होती.
‘पुन्हा एकदा भेटुनी सारे, जागवू महाविद्यालयाच्या आठवणी.आणि ते क्षण आनंदी सारे साठवून ठेवूया मनामध्ये’ अशा भावना प्रत्येक माजी विद्यार्थ्यांच्या मनात होत्या. महाविद्यालयाची इमारत, वर्ग, जुने किस्से एकमेकांना सांगत होते.
बांदोडकरमध्ये चार अद्ययावत प्रयोगशाळा
प्रतिनिधी, ठाणे
ठाणे शहरातील विद्या प्रासारक मंडळाचे बा.ना. बांडोदकर विज्ञान महाविद्यालयात रसायनशास्त्राच्या चार प्रयोगशाळा आहेत. त्यातील ३ प्रयोगशाळा या पदवी शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तर एक प्रयोगशाळा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रयोगशाळा क्रमांक१ ही कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आहे. या प्रयोगशाळेमध्ये प्रथम वर्षांला शिकणारे विज्ञान शाखेतील ८० विद्यार्थी एकावेळी विविध प्रयोग करत असतात. प्रयोगशाळा क्रमांक २ मध्ये द्वितीय आणि तृतीय वर्षांत शिकणारे ६० विद्यार्थी एकावेळी प्रयोग करतात. भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत एकावेळी द्वितीय वर्षांतील २० मुले प्रयोग करतात तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भाग १ व भाग २ मधील एकूण ४० विद्यार्थ्यांसाठी एक प्रयोगशाळा आहे. प्रयोगशाळेमध्ये ओव्हन, स्पेक्ट्रोफोटोमीटर, संक्शन पंप, आईस कुलर आदी सुविधा उपलब्ध आहेत. भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत ३ संगणक आणि इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वनस्पतीशास्त्र या विषयासाठी एक शोध प्रयोगशाळा असून एक प्रयोगशाळा पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या प्रयोगशाळेत मायक्रोस्कोप, ईलेक्ट्रोफोरीस, डीएसएलआर ओव्हन आदी सुविधा उपलब्ध आहेत. शिवाय या प्रयोगशाळेत इंटरनेटसह दोन संगणक असून विद्यापीठातर्फे शोधनिबंधाचे कामही या प्रयोगशाळेत सुरू आहे.
जीवरसायनशास्त्र विषयाचीही एक प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेतही संगणक असून ३५ विद्यार्थी एकाचवेळी प्रयोग करू शकतात. बायोटेक आणि सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत इन्क्टुबेटर्स,ऑटोक्लेव्हस, मॅग्नेटीक, रेफ्रिजरेटर आणि प्रयोगास लागणारी उपयुक्त साधनसामुग्री आदी सुविधा आहेत.

संकलन : किन्नरी जाधव