सिमला कुल्फी सेंटर
यंदा जरा जास्त काळ लांबलेला थंडीचा मुक्काम हलला आहे. दिवसाच्या कडक उन्हासोबत संध्याकाळची दमट हवा जोर धरत आहे. अशा मोसमात थंड पदार्थ खुणावत असतात. मग घराखालच्या जनरल स्टोअर्सच्या फ्रीजमधले फॅमिली पॅक असो की नाक्यावरच्या कुल्फीवाल्याची कुल्फी असो, रात्रीच्या जेवणानंतरचा त्यासाठी मारलेला एक ‘राऊंड’ दिवसभरातल्या उकाडय़ाने उबगलेल्या शरीराला काहीसा थंडावा देतो. त्यातही फिरता फिरता कुल्फीचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच. लाकडी काठीभोवती गोठवलेले हे गोड माव्याचे मिश्रण जिभेची सलगी करीत पोटात जाऊ लागले की तनमनाची काहिली कमी होत जाते. अशा या कुल्फीची वेगळी लज्जत चाखायची असेल तर एकदा तरी कोपरी कॉलनीतल्या ‘सिमला कुल्फी सेंटर’ला अवश्य भेट द्या. ‘सिमला’ची कुल्फी तुम्हाला सिमलाचा गारवा देईलच; पण तुमच्या जिभेलाही तृप्त करेल.
tv11ठाणे पूर्व विभागातील कोपरी येथील ‘सिमला कुल्फी सेंटर’ आता बऱ्यापैकी लोकप्रिय आहे. येथे पारंपरिक मलाई, पिस्ता, केशर पिस्ता या प्रकारांसहित जवळ जवळ १५ वेगवेगळे कुल्फीचे प्रकार उपलब्ध आहेत. तसेच येथे मँगो, स्ट्रॉबेरी, चिकू, काजू अंजीर, सीताफळ आणि अ‍ॅपल क्रश असे फळांपासून बनवलेले काही कुल्फीचे प्रकारही उपलब्ध आहेत. लहान मुलांचे आवडीचे चॉकलेट प्रीमियम, टूटी फ्रुटी आणि बटरस्कॉच हेही प्रकार येथे मिळतात. ‘सिमला कुल्फी सेंटर’चे स्वत:चे काही फ्लेवर त्यांनी तयार केले आहेत. त्यामध्ये अस्सल मधाचा वापर करून बनवण्यात आलेली ‘हनी डय़ू’ या कुल्फीचा एक ‘बाइट’ घेतल्यावर जिभेवर जो काही मधाचा वर्षांव होतो त्याचा आनंद काही औरच. गुलाबाच्या पाकळय़ांच्या गुलकंदाची कुल्फी असो की काजूचे आवरण असलेली ‘काजू’ कोटेड कुल्फी असो, सिमलाच्या ताफ्यात तुमच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या अनेक कुल्फ्या उपलब्ध आहेत. येथे १० रुपयांपासून ते ८० रुपयांपर्यंत कुल्फी मिळते.
ठाण्यातील वर्मा कुटुंब हे गेल्या अर्धशतकाहून अधिक वर्षे कुल्फी बनवण्याच्या या व्यवसायात आहेत. वेदराम वर्मा यांनी पन्नास वर्षांपूर्वी कोपरी येथील गावदेवी मंदिरासमोरील एका लहानशा गाळ्यात बर्फाचे कॅण्डी आइसक्रीम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर कालांतराने आइसक्रीम बनवण्याचा कारखानाच तिथे त्यांनी सुरू केला. त्यांच्या मुलाने-राजेश वर्माने हाच व्यवसाय पुढे चालवत त्यात नवनवीन प्रयोग केले. त्यातून त्यांनी तब्बल १५ प्रकारची कुल्फी तयार केली. सध्या कुल्फी व्यवसायात त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. भविष्यातही वर्मा कुटुंबीय ठाणेकरांच्या जिभेचे चोचले पुरविण्याचे काम असेच चोखपणे करीत राहील, अशी ग्वाही सिमला कुल्फी सेंटरचे संचालक धीरज वर्मा यांनी दिली. गेल्या काही वर्षांत देशी-विदेशी आइस्क्रीम पार्लरनी ठाण्यात गर्दी केली आहे.  या स्पर्धेतही सिमला कुल्फीने स्वत:चे अस्तित्व टिकवले आहे. मोठमोठय़ा ब्रॅण्डशी ही कुल्फी यशस्वीपणे टक्कर देत आहे. खवय्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ‘उत्तम चव’ हाच आपला फॉम्र्युला असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थळ : शॉप क्र. ५०, गावदेवी मंदिराजवळ, स्टेशन रोड, कोपरी कॉलनी, ठाणे (पू).
वेळ : सकाळी १० ते रात्री ९.३०
शलाका सरफरे