08 July 2020

News Flash

वसईचा चाफा गावातच खुलेना

वसई तालुक्यात सोनचाफ्यासह मोगरा, जाई-जुई आदी फुलांची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते.

स्थानिक बाजारपेठ नसल्याने फुलांची मुंबईत पाठवणी; मुंबईहून येणाऱ्या फुलांना मात्र चढा भाव
वसई तालुक्यात सोनचाफ्यासह मोगरा, जाई-जुई आदी फुलांची शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. मात्र या फुलांचा फायदा ना शेतकऱ्यांना होत, ना वसईकरांना. कारण ही फुले शेतकऱ्यांकडून आधी दादरच्या फुलबाजारात जातात आणि तेथून पुन्हा वसईत विक्रीसाठी येत असल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत नाही, त्याशिवाय वसईकरांनाही महाग दराने फुले खरेदी करावी लागतात. वसईत जर फुलांची बाजारपेठ असती तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांसह वसईकरांना झाला असता.
वसई तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर फुलांची शेती केली जाते. येथील लागवड होणारा सोनचाफा खूपच प्रसिद्ध आहे. दादरच्या फुलबाजारात वसईतील सोनचाफ्याला खूपच मागणी आहे. वसईत फुलांची बाजारपेठ नसल्याने शेतकऱ्यांना भल्या पहाटे दादरच्या बाजारात ही फुले व्यापाऱ्याला विकावी लागतात. तेथून पुढे हीच फुले वसईत विक्रीसाठी येतात. वसईत कृषी उत्पन्न बाजार समिती नाही. ती सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. महामार्गावर त्यासाठी भूखंडही आरक्षित करून ठेवण्यात आलेला आहे. परंतु तो अद्याप सुरू झालेला नाही.

वसईत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारपेठेसाठी जागा उपलब्ध नाही. बाजारासाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बाजारासाठी फंड उपलब्ध आहे. जागा मिळाल्यास तेही उपलब्ध होऊन या परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दादर येथे न जाता येथेच चांगला भाव उपलब्ध होईल.
विलास पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती

आमची वटारगावात फुलांची शेती आहे. पण आम्हालाच ही फुले मुंबईच्या बाजारात नेऊन विकावी लागतात. पहाटे अडीच वाजता आम्ही ट्रेन पकडून मुंबईत जातो. तेथील घाऊक बाजारात फुले विकतो. तेथून हीच फुले पुन्हा वसईच्या बाजारात किरकोळ विक्रीसाठी येत असतात. जर वसईला फुलांची बाजारपेठ झाली तर शेतकऱ्यांचा त्रास वाचेल, त्यांना चांगला भाव मिळेल आणि वसईकरांनाही स्वस्तात फुले-भाजीपाला मिळू शकेल.
– विलास नाईक, शेतकरी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 4:35 am

Web Title: farmers demand flowers market in vasai
टॅग Flower
Next Stories
1 पाच नगरसेवकांचे भवितव्य पालिकेतील महासभेच्या हाती
2 धारावी किल्ल्याने मोकळा श्वास घेतला
3 वाळूउपशामुळे वसईतील समुद्रकिनारे धोकादायक
Just Now!
X