भाडे परवडत नसल्याची रुग्णवाहिका चालकांची तक्रार

 

विरार : करोनाकाळात शासनाने रुग्णांची आर्थिक लूट होऊ  नये म्हणून राज्यभर रुग्णवाहिकेचे किलोमीटरप्रमाणे दर ठरवून दिले आहेत. असे असतानाही वसई-विरारमध्ये रुग्णवाहिकाचालकांकडून अवाच्या सवा भाडे आकारून रुग्णांची  मोठी आर्थिक लूट सुरू आहे. तर शासनाने आखून दिलेले भाडे परवडत नसल्याची वाहनचालकांची तक्रार आहे.

शहरात करोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी रुग्णवाहिकेचा वापर मात्र वाढत आहे. रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने अनेक रुग्णांना उपचारांसाठी ताटकळत राहावे लागते. अशातच रुग्णवाहिका सापडली तर ती काही मिनिटांच्या अंतरासाठी हजारो रुपये घेत आहे. शासनाने रुग्णवाहिकेचे दर निश्चित के ले असतानाही वसई-विरारमध्ये रुग्णवाहिकाचालकांकडून रुग्णांची वारेमाप आर्थिक लूट सुरू आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्याकडून दिलेल्या माहितीनुसार वसई-विरार एमएच ४८ रिजनमध्ये २५ किमी अथवा दोन तासांसाठी वाहनाच्या प्रकारावरून दर ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार मारुती व्हॅन रुग्णवाहिका – ७०० रुपये २५ किमीसाठी, वर १४ रुपये प्रति किमी, टाटा सुमो, मेटेडोअर रुग्णवाहिका – ८४० रुपये २५ किमीसाठी, वर १४ रुपये प्रति किमी, टाटा ४०७ स्वराज मजदा आदीच्या साठ्यावर बांधणी केलेली रुग्णवाहिका – ९८० रुपये २५ किमीसाठी,         वर २० रुपये प्रति किमी, आयसीयू तथा वातानुकू लित रुग्णवाहिका – ११९० रुपये २५ किमीसाठी, वर २४ रुपये प्रति किमी. सदरचे दर हे १६ जून २०२० रोजी राज्यभर लागू करण्यात आले आहेत. या दरानुसारच रुग्णवाहिकांना रुग्णांकडून भाडे आकारायचे आहे. असे न केल्यास वाहन आणि चालक, मालकावर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले होते.

दर निश्चित असतानाही वसई-विरारमध्ये रुग्णवाहिका रुग्णांची ने-आण करताना वाजवीपेक्षा अधिक भाडे वसूल करतात. रुग्णाला उपचारांची गरज असल्याने नातेवाईकसुद्धा कोणतीही तक्रार न करत भाडे देतात. विशेष बाब म्हणजे याचे कोणतेही देयक रुग्णवाहिकाचालक देत नाहीत अथवा कच्चे देयक दिले जाते. यामुळे कुठे तक्रारींना वाव मिळत नाही. तसेच नागरिकांना या दराविषयी कोणतीही माहिती नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची खुलेआम लूट सुरू असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेश ढगे यांनी केला आहे.

रुग्णवाहिकांना शासकीय दराप्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक आहे. अशा स्वरूपातल्या तक्रारी प्राप्त झाल्यास आम्ही त्यावर कारवाई करू. नागरिकांनी परिवहन कार्यालयाकडे या संदर्भातल्या तक्रारी कराव्यात. – प्रकाश बागडे, वसई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे परिवहन अधिकारी

 

शासनाने दर ठरवताना रुग्णवाहिकाचालक- मालकांना विश्वासात घेतले नाही आहे. शासनाचे दर परवडत नसल्याने आम्ही आमच्या दराने भाडे आकारत आहोत. चालकाचे भाडे, डिझेल, पीपीई किट, वाहन निर्जंतुकीकरण याचा खर्च अधिक आहे. – विकास सुर्वे, रुग्णवाहिका चालक-मालक संघटना, वसई