नकली बंदुकीमुळे पोलीसही चक्रावले

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर एका वाहनचालकाने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. विरार पोलिसांनी नाकाबंदी करून काही तासांतच गोळीबार करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याच्याकडे आढळळेलीे बंदूक ही चित्रपटात  वापरली जाणारी नकली बंदूक असल्याचे निष्पन्न झाले आहे. बॅलेस्टिक विभागाकडे ती तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.

वसईच्या नवसई येथे राहणारे जयेश कडू हे शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून विरारच्या शिरसाड येथे जात होते. विरारच्या शिरसाड येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी होती. त्यांचे वाहन रस्त्यात उभे होते. त्यावरून एका जग्वार गाडीचालकाशी त्यांचा वाद झाला. गाडीतील इसमाने खालीे उतरून आपल्या रिव्हॉल्वरमधून तीन गोळ्या हवेत झाडून मनोरच्या दिशेने पसार झाला. गोळीबाराच्या आवाजाने खळबळ उडाली. विरार पोलिसांनी त्या वाहनचालकाला पकडण्यासाठी सर्वत्र नाकाबंदी केली. गुजरात पोलिसांनाही कळविण्यात आले होते. अज्ञात व्यक्तीविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सीसीटीव्ही चित्रण मिळवून त्या व्यक्तीचा शोध सुरू होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास हा व्यक्ती जग्वार गाडीतून शिरसाड नाक्यावरून जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हा व्यक्ती ३९ वर्षांचा असून तो जुहू येथे राहतो. तो एका व्यावसायिकाचा मुलगा असून मनोर येथे त्यांचा कारखाना आहे.त्याच्याकडे एक बंदूक सापडली आहे. ऑनलाइनद्वारे त्याने ही बंदूक मागवली होती. ही बंदूक चित्रपटात वापरतात. त्यातून गोळीबाराचा आवाज येतो आणि धूरही निघतो, असे विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. ही बंदूक बॅलेस्टिक विभागाकडे पाठवली असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले.

जिवाला धोका वाटल्याने गोळीबार

माझ्या जिवाला धोका वाटला म्हणून मी गोळीबार केला होता असे स्पष्टीकरण आरोपीने दिले. त्याची कुठलीही गुन्हेगारी पाश्र्वभूमी नसल्याचे पोलिसांनी सांगितले.