जलवाहिनीत घुसलेला जेसीबीचा ‘पंजा’ काढला; जमीन अधिग्रहणाचा तिढा
दीड वर्षे मुदतीत काम पूर्ण होणे अपेक्षित असूनही आता पाच वर्षे झाली तरी मोहने रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे काम अपूर्णच आहे. मार्च २०१५ पर्यंत या कामाची मुदत वाढवून हे काम पूर्ण करण्याचे आदेश पालिकेच्या प्रकल्प अभियंत्याने ठेकेदाराला दिले होते; परंतु त्यालाही आता वर्ष झाले. आता कुठे पुलाच्या कामाने गती घेतली आहे. या पुलाच्या कामासाठी पाच वर्षांपूर्वी खोदकाम सुरूअसताना, जमिनीखाली असलेल्या जलवाहिनीला जेसीबीचा फटका बसला. जेसीबीचा पंजा जलवाहिनीत अडकून पडला. पुलाच्या कामात नवीन संकट उभे राहिल्याने तत्कालीन पालिका अधिकाऱ्यांनी हा विषय नगरसेवक, पदाधिकाऱ्यांपासून लपवून ठेवण्यात धन्यता मानली. पूल रखडण्याला जलवाहिनीत अडकलेला पंजा हे एक महत्त्वाचे कारण होते, हा विषय अलीकडे नगरसेवकांना समजला आहे.
मध्य रेल्वेच्या आंबिवली ते शहाड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान वडवली येथे रेल्वे फाटक आहे. मोहने येथून रस्त्याने येणारी वाहने या रेल्वे फाटकातून कल्याण येथे जातात. हे रेल्वे फाटक बंद करण्यासाठी पाच वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने रेल्वेच्या सहकार्याने काम हाती घेतले. रेल्वे मार्गावरील पुलाचे काम रेल्वेने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. पुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्त्याचे काम पालिका प्रशासनाने करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे उड्डाणपुलावरील पुलाचे काम रेल्वेने पूर्ण करून दीड वर्ष होत आले. तरीही पालिकेच्या पोहोच रस्त्यांचे काम अद्याप सुरू झालेले नाही.
या पुलाचे काम सुरू असताना पालिका अधिकाऱ्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे भूसंपादन केले नसल्याचे नंतर उघड झाले. जमीन ताब्यात मिळत नसल्याने ठेकेदाराला या भागात काम करणे अवघड जात होते. स्थानिक जमीनमालक ठेकेदाराला पुलाच्या पोहोच रस्त्यांच्या जमिनीवर पाय ठेवून देत नव्हते. पालिकेने काही जमीन ताब्यात घेऊन पुलाच्या पोहोच रस्त्यांचा पाया तयार करण्याचा प्रयत्न केला. या कामासाठी जमीन खोदण्याचे काम सुरू असताना पुलाच्या जमिनीखाली जलवाहिनी आहे. याची जाणीव पालिका अधिकाऱ्यांना नव्हती. जेसीबीने या भागात जमीन खोदकाम सुरू असताना जेसीबीच्या पंजाचा जोरदार फटका जमिनीखालील जलवाहिनीला बसला. फटक्यासरशी जलवाहिनी फुटलीच, पण जेसीबीचा पंजा जलवाहिनीत अडकून पडला. अधिकाऱ्यांनी या विषयाची बोंब नको म्हणून पंजा अडकलेली जलवाहिनी आहे तशीच माती टाकून बुजवून टाकली.
नगरसेवक रमेश जाधव यांनी मोहने उड्डाणपुलाचे काम रखडले म्हणून विषय उपस्थित केला होता.जमीन ताब्यात नसताना पुलाचा ठेका मोरेश्वर बिल्डर्स या ठेकेदाराला दिलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, तेथील जलवाहिनी जेसीबीने फोडेपर्यंत अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न राजन सामंत यांनी केल्यानंतर उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली.
पंजा काढण्यासाठी पाच लाख खर्च
आयुक्त ई. रवींद्रन यांनी या रखडलेल्या पुलाच्या कामाचा आढावा घेतला. त्या वेळी पुलाच्या लगत जमिनीखाली एक जलवाहिनी गेली आहे, त्या जलवाहिनीला जेसीबीच्या पंजाचा फटका लागून ती फुटली. पंजा त्या जलवाहिनीत अडकून पडला असल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली.अलीकडे सुमारे पाच लाख रुपये खर्च करून जलवाहिनी बाजूला सरकवणे व त्यात अडकलेला पंजा काढण्याचे काम करण्यात आल्याचे सर्वसाधारण सभेत प्रशासनाने दिलेल्या माहितीवरून उघड झाले.

खासगी जमीनमालकांनी जमीन उपलब्ध करून द्यावी, यासाठी आयुक्त ई. रवींद्रन यांनी मालकांशी चर्चा केली आहे. दोन मालकांबरोबर चर्चा करून भूसंपादनाचा विषय मिटवला आहे. दोन जणांबरोबर चर्चा सुरू आहे. उपलब्ध जमिनीवर पुलाच्या पोहोच रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबरअखेपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल. आता अन्य कोणतेही अडथळे नाहीत.
– दीपक भोसले, कार्यकारी अभियंता, प्रकल्प विभाग