‘ट्रेक क्षितिज’च्या उपक्रमाला रसिकांची दाद

दिवाळीनिमित्ताने गल्लीबोळातील किल्ले बांधणी स्पर्धेतून लहान मुलांचे मनोरंजन होत असले, तरी त्यातून किल्ले बांधणीचे व्यापक दर्शन घडत नाही. शिवाय या माध्यमातून किल्ल्यांची वास्तव माहितीही समाजापर्यंत पोहचत नाही. डोंबिवलीतील ‘ट्रेक क्षितिज’ या संस्थेने मात्र यंदा किल्ल्यांचे वास्तववादी दर्शन प्रदर्शनाच्या माध्यमातून घडविण्याचा प्रयत्न केला आहे. गणेश मंदिर संस्थानच्या सहकार्याने डोंबिवली शहरातील सवरेत्कृष्ट किल्ले बांधणाऱ्या गटांना एकाच ठिकाणी बोलवून ‘ट्रेक क्षितिज’ संस्थेने त्यांच्याकडून किल्ले बांधून घेतले आहेत. गणेशमंदिराच्या परिसरात पाच किल्ल्यांच्या छोटय़ा प्रतिकृती  साकारल्या असून त्यातून किल्ल्यांची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. येत्या ६ नोव्हेंबपर्यंत हे किल्ले सर्वाना पाहता येणार आहेत.

वैशिष्टय़पूर्ण किल्ले..

या किल्ल्यांच्या बांधणीसाठी लागणारे सर्व साहित्य पर्यावरणस्नेही आहे.  दगडमाती शिवाय शहाळ्याचे आवरण, लाकडाचा भुसा, रांगोळ्यांचे रंग अशा वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करण्यात आला आहे. किल्ल्यांची हुबेहुब प्रतिकृती बनवण्यासाठी गुगल मॅप तसेच ट्रेकिंगची माहिती असलेल्या संकेतस्थळांचा वापरही केली आहे.  या उपक्रमामध्ये ‘अ‍ॅड्राईड ग्रुप’, ‘लक्ष्मीकांत सोसायटी’, ‘किल्लेदार’, ‘रघुनाथ सोसायटी’ आणि ‘स्वराज्य’ या गटांनी भाग घेतला होता.