भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरण

ठाणे : भिवंडी येथील कामतघर भागात जिलानी ही अनधिकृत इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ठाणे पोलिसांनी तत्कालीन महापालिका साहाय्यक आयुक्तासह चौघांना अटक केली आहे. सप्टेंबर २०२० मध्ये जिलानी इमारत कोसळून ३८ जणांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले होते.

भिवंडी महापालिकेतील तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, तत्कालीन निरीक्षक सुनील वगळ, भूभाग लिपीक प्रफुल्ल तांबे आणि इमारतीचे बांधकाम करणारा मोहमंद रसूल फंडोले अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. कामतघर येथील पटेल कंपाऊंड भागात २१ सप्टेंबर २०२०ला पहाटे तीन वाजेच्या सुमारास जिलानी ही तीन मजली अनधिकृत इमारत कोसळली होती. या घटनेत ३८ जणांना जीव गमवावा लागला, तर २३ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात मोहमंद फंडोले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र मोहमंद याने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने तो जामीन अर्ज फेटाळला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पोलिसांनी मोहमंदचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या चौकशीत या प्रकरणामध्ये तत्कालीन साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव, तत्कालीन निरीक्षक सुनील वगळ आणि भूभाग लिपिक प्रफुल्ल तांबे यांची नावे निष्पन्न झाली. त्यानंतर पोलिसांनी तिघांनाही अटक केली.