कल्याणमध्ये ११८ वर्षांपूर्वी गणपती तयार करण्याचा कारखाना सुरू करणाऱ्या रघुनाथ काशीनाथ गोडसे यांची चौथी पिढी निष्ठेने गणपतीच्या मूर्ती घडविण्याचा व्यवसाय करीत आहे. गोडसे कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय पौरोहित्य (भिक्षुकी). पौरोहित्य व्यवसायात या कुटुंबीयांची सातवी पिढी कार्यरत आहे.

गोडसे कुटुंब हे मूळचे पेणजवळील (रायगड) वरसई गावचे रहिवासी. रघुनाथ गोडसे हे पौरोहित्य करायचे. पेण येथे प्रसिद्ध गणपती मूर्तीचे कारागीर राजाभाऊ देवधर यांच्या घरी ते पौरोहित्यासाठी जायचे. त्यांचा देवधर यांच्याबरोबर स्नेह जुळला. देवधर यांच्याकडून रघुनाथ गोडसे यांनी गणपती मूर्ती तयार करण्याची कला शिकून घेतली. वेदविद्यासंपन्न रघुनाथ गोडसे कल्याणमधील दत्तआळीत आले. गोडसेवाडा हे त्यांचे कायमचे निवासस्थान झाले. १८९७ मध्ये त्यांनी कल्याणमध्ये गणपती तयार करण्याचा कारखाना सुरू केला. रघुनाथ यांच्यानंतर त्यांचा मुलगा वैजनाथ, त्यानंतर भास्कर गोडसे यांनी पौरोहित्य करण्याबरोबरच गणपती तयार करण्याची परंपरा सुरू ठेवली. आता भास्कर गोडसे यांची मुले दिलीप, प्रवीण ही परंपरा पुढे चालवत आहेत. भास्कर हे जे.जे.स्कूलचे विद्यार्थी होते. कलेत त्यांचा हातखंडा होता. ही शिकवण त्यांनी आपल्या मुलांना दिली. कल्याणच्या साठे घराण्यातील गणपती गोडसे कुटुंबीयांनी तयार केलेला असायचा. अनेक वर्ष ही परंपरा होती, असे चौथ्या पिढीचे वारसदार दिलीप गोडसे यांनी सांगितले.
१९६२ मध्ये भास्कर गोडसे यांनी डोंबिवलीत टिळक रस्त्यावर त्रिमूर्ती पोळी भाजी केंद्रासमोर गणपतीचा कारखाना सुरू केला. आटोपशीर जागेत आजही कारखाना सुरू आहे. दिवाळी झाली की गुजरातहून माती (शाडू) आणली जाते. त्यानंतर गणपती मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले जाते. येथे सुमारे ९५० मूर्ती दरवर्षी तयार केल्या जातात. वडिलांपासूनचे ग्राहक आजही आमच्या कारखान्यातून गणपती मूर्ती नेतात. अमेरिका, मॉरिशस, दुबई या ठिकाणी आमच्या गणेश मूर्ती नेल्या जातात. माघी गणेशोत्सवासाठी काही मूर्ती करतो, असे दिलीप गोडसे यांनी सांगितले.

शताब्दी पुरस्कार
गोडसे कुटुंबीयांनी ११८ वर्षे गणपती मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय निष्ठेने, प्रामाणिकपणाने सुरू ठेवला आहे. पौरोहित्याबिरोबर जोड व्यवसाय म्हणून गोडसे यांच्या पूर्वजांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्यांची चौथी पिढी निष्ठेने पुढे नेत आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी या वर्षीचा सार्वजनिक शताब्दी गणेशोत्सव मंडळाचा शताब्दी पुरस्कार गोडसे कुटुंबीयांना देण्यात येत आहे.
-वामनराव साठे,
शताब्दी पुरस्कार समन्वयक, कल्याण</p>