25 February 2021

News Flash

ठाण्यातील औषध दुकानात कोल्हा

खारकर आळीतील भरदिवसा घटना

खारकर आळीतील भरदिवसा घटना

ठाणे : ठाण्यातील खारकर आळी परिसरात एका औषधालयामध्ये सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास एक कोल्हा शिरल्याचा प्रकार समोर आला यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. दुकानमालकानी तात्काळ ही माहिती वन विभागाला दिली. माहिती मिळताच वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कोल्ह्य़ाला दुकानातून बाहेर काढले. या कोल्ह्य़ाच्या पायावर श्वान चावल्याची जखम असून त्याला वैद्यकीय तपासणीसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पाठविण्यात आले आहे तसेच अद्याप या कोल्ह्य़ाचे वय समजले नसल्याची माहिती वन विभाग अधिकारी संजय पवार यांनी दिली.

ठाण्यातील खारकर आळी हा परिसर अतिशय वर्दळीचा असून या परिसरातील एका औषध दुकानात सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कोल्हा शिरला आणि दुकानाच्या आतमध्ये जाऊन बसला. दुकान मालकाला  सुरुवातीला तो श्वान असल्याचे वाटल्याने त्याला झाडूच्या सहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, त्यावेळी त्याने झाडू पकडली तेव्हा दुकानमालकाला तो कोल्हा असल्याचे समजले. त्यावेळी दुकानमालक दुकान बंद करून बाहेर आला आणि तात्काळ ही माहिती वन विभागास दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाला  त्या कोल्ह्य़ाला बाहेर काढण्यात यश आले. कोल्ह्य़ाच्या पायावर श्वान चावल्याचे जखम असल्याचे वन विभाग अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. ठाणे खाडी या परिसरापासून ५०० मिटर अंतरावर असल्याने खाडीत अन्नाच्या शोधात आलेल्या या कोल्ह्य़ाच्या मागे श्वान लागल्याने तो औषध दुकानात शिरला असल्याचा अंदाज वन विभाग अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 2:46 am

Web Title: fox entered in medical store in thane zws 70
Next Stories
1 ‘एटीव्हीएम’ यंत्रणा बंद पडल्याने प्रवाशांचे हाल
2 आव्हाडांची टोलेबाजी शिवसेनेच्या जिव्हारी
3 शहरबात : जीर्ण व्यवस्थेला बळकटीची गरज
Just Now!
X