‘कडोंमपा’चा निर्णय : केसरी, पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसह पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही लाभ

भगवान मंडलिक, लोकसत्ता

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील करोना रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शहरातील केसरी आणि पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसह पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना टोसिलीझुमॅब, रेमडेसिविर हे इंजेक्शन तसेच फॅविपीरवीर गोळ्या मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

टोसिलीझुमॅब, रेमडेसिविर हे इंजेक्शन करोना रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे बहुतांशी खासगी, पालिका नियंत्रित रुग्णालयातून करोनाबाधित रुग्णांना डॉक्टरकडून औषधे आणण्यासाठी चिठ्ठी लिहून दिली जात आहे. मात्र, ही औषधे रुग्णाच्या नातेवाईकांना बाजारात सहज उपलब्ध होत नाहीत. या महागडय़ा औषधांसाठी घाटकोपर, भायखळापर्यंत रुग्णाच्या नातेवाईकांना जावे लागते. तेथेही ती मिळण्याची खात्री नसते. या औषधांची काळाबाजारात विक्री होत असल्याची प्रकरणे पुढे आली होती. यामध्ये काही दलालांना अन्न औषध प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे.

करोनाचा संसर्ग झाल्यामुळे रुग्ण आणि त्याचे नातेवाईक आधीच हैराण झाले असतात आणि त्यामुळेच त्यांना औषधांसाठी वाढीव खर्च करावा लागू नये यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही औषधे

रुग्णांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका नियंत्रित करोना रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांना ती मोफत देण्यात यावीत. त्यासाठी रुग्णाचे केसरी, पिवळी शिधापत्रिका पाहून तसेच आधारकार्डची नक्कल प्रत घ्यावी. तसेच पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड पाहून त्यांनाही अशा प्रकारची मोफत सुविधा द्यावी, अशा सूचना प्रशासनाने रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या आहेत.

फॅविपीरवीर औषध पालिकेच्या भांडारात उपलब्ध आहे. तर दोन्ही इंजेक्शन वैद्यकीय प्रमुखांच्या नियंत्रणाखाली पुरवठादारांकडून मागणीप्रमाणे पालिका नियंत्रित करोना रुग्णालयांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

आर्थिकदृष्टय़ा सक्षम रुग्णांना छापील किंमतीत औषधं

पालिका हद्दीतील ज्या करोनाबाधित रुग्णांकडे पिवळी, केसरी शिधापत्रिका नाहीत. अशा रुग्णांना औषध आणि इंजेक्शनच्या पाकिटावरील छापील किमतीप्रमाणे पैसे घेतले जाणार आहेत. रेमडेसिविर १०० मिलिग्रॅम इंजेक्शनची खरेदीची किंमत पाच हजार १८ रुपये होती. या इंजेक्शनसाठी यापूर्वी रुग्णावर उपचार करताना मूळ किंमत तीन हजार ३९२ रुपये वसूल करण्यात आली आहे. यापुढे रुग्णांकडून इतकीच किंमत वसूल करावी. या सर्व नियमांचे रुग्णालय व्यवस्थापनाने पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त सूर्यवंशी यांनी दिला आहे. तसेच पालिका हद्दीतील पालिका नियंत्रित करोना रुग्णालयांनी रुग्णांजवळील कागदपत्रांची पूर्तता करून करोनावरील उपचाराची इंजेक्शन, गोळ्या मोफत उपलब्ध करुन द्यावीत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हयगयपणा करू नये, असे आदेशही त्यांनी दिले आहेत.

मोफत लाभ मिळणारी रुग्णालये

शास्त्रीनगर, डोंबिवली, आर.आर., एमआयडीसी, सावळराम महाराज बंदिस्त क्रीडागृह, डोंबिवली, पाटीदार भवन, दावडी, डोंबिवली, डोंबिवली जिमखाना, कल्याणमधील होली क्रॉस, रुक्मिणीबाई प्लाझा टिटवाळा, वसंत व्हॅली, लाल चौकी, कलादालन, आसरा फाऊंडेशन, गोविंदवाडी, कल्याण.