‘रेंज’ मिळवण्यासाठी प्रवाशांचे फलाटावर हेलपाटे

मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकांमध्ये सुरू केलेली मोफत वायफाय सुविधा ठाणे रेल्वे स्थानकातही कार्यान्वित झाली असली तरी सोमवारी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना चांगलीच धावपळ करावी लागली. स्थानकात वायफाय सुविधा सुरू झाल्याचे फलक रविवारपासून लावण्यात आले असले तरी अनेक ठिकाणी वायफायची ‘रेंज’ मिळत नसल्याने प्रवाशी फलाटावर इकडून तिकडे हेलपाटे मारत मोफत इंटरनेटच्या सुविधेचा शोध घेताना दिसत होते.

कल्याण, दादर रेल्वे स्थानकाच्या पाठोपाठ ठाणे रेल्वे स्थानकातदेखील नि:शुल्क वायफाय सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र स्थानकात वायफाय सेवेचा दर्जा असमान आहे. काही ठिकाणी चांगला स्पीड मिळत होता, तर काही ठिकाणी अगदीच मंद सिग्नल मिळत होते. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात बसविण्यात आलेल्या वायफायची रेंज नेमक्याकोणत्या अंतरापर्यंत उपलब्ध आहे, याविषयी मात्र प्रवासी अनभिज्ञ आहेत. फलाट क्रमांक एकवर मुंबईच्या दिशेला वायफायची रेंज कमी आहे, मात्र कर्जत दिशेला चांगली रेंज मिळते.

ठाणे रेल्वे स्थानकात नेहमीच प्रवाशांचा राबता असतो. वायफाय सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे निश्चितच प्रवाशांना याचा उपयोग होताना दिसेल. रेल्वे स्थानकात ठिकठिकाणी नि:शुल्क वायफाय सुविधेची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र याची पुरेपूर माहिती नसल्याने प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून आला. तसेच एकीकडे वायफाय सुरू झाल्याची माहिती प्रवाशांना समजताच काही प्रवासी स्थानकातील वायफायचा कार्यालयीन कामासाठी उपयोग करताना दिसत होते. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते फलाट क्रमांक दहा या ठिकाणी वायफाय यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र, रेल्वे स्थानकातील पुलावर वायफाय सुविधा बंद पडते. विशेष म्हणजे फलाट क्रमांक एकवर वायफाय यंत्रणा असली तरी या ठिकाणी वायफाय बंद पडत असल्याच्या तक्रारी आहेत.

पुलाच्या कामामुळे विघ्न

फलाट क्रमांक एक येथून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर पुलाचे काम सुरू असल्याने या ठिकाणी वायफाय बंद पडत असावे. वायफाय सुविधेच्या वेगाविषयीच्या तांत्रिक बाबींविषयी रेल नेटच्या माध्यमातून काम पाहिले जाते. संबंधित ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे जबाबदारी नसते, असे ठाणे रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

‘वायफाय’ असे मिळवा..

  • रेल्वे स्थानकात प्रवेश केल्यावर वायफाय सुविधा जोडता येऊ शकते.
  • प्रवाशांनी वायफाय सुविधा सुरू केल्यावर नोंदणीसाठी वायफाय लॉगइन करावे लागते.
  • लॉगइन करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक टाकल्यावर कोड क्रमांक येतो.
  • हा कोड क्रमांक टाइप केल्यावर वायफाय सेवा सुरू होते.