बदलापूरच्या जोडीनेच वेगाने विकसित होत असलेल्या अंबरनाथ शहरातील वाढती वाहतूक कोंडी हा सध्या चिंतेचा विषय आहे. बहुतेक मुख्य रस्ते अरुंद असून खड्डय़ांमुळे त्यांची चाळण झाली आहे. त्यातही स्थानक परिसरातील मुख्य रस्त्यांवर फेरीवाल्यांचे आक्रमण आहे. स्थानक परिसरात अद्याप पार्किंगची समस्या सुटलेली नसल्याने रस्त्यांच्या दुतर्फा दुचाकी आणि चार चाकी वाहने उभी करून ठेवलेली असतात. त्यामुळेही पादचाऱ्यांची अडवणूक होत आहे.

शहरीकरणाच्या रेटय़ात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. मात्र नियोजनाच्या अभावाने आजचे अंबरनाथ शहर वाहतूक कोंडीत अडकल्याचे चित्र आहे. रेल्वे स्थानक परिसर हा सर्वात जास्त वर्दळीचा असून त्याच्याच बाहेर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. पूर्वी नियोजनात दुर्लक्ष झाल्याने आजची वाहतुकीची परिस्थिती बिकट आहे. मात्र आज काही ठोस निर्णय वाहतूक कोंडी कमी करण्यास हातभार लावू शकतात. साधारणत: ४० चौरस किलोमीटरचे क्षेत्र असलेल्या अंबरनाथ शहरातील निम्मा भाग हा आयुध निर्माण संस्था आणि औद्योगिक विकास महामंडळासाठी वापरला गेला आहे. त्यामुळे जवळपास २० चौरस किलोमीटर क्षेत्रावर तब्बल तीन लाख लोकसंख्या राहते. त्यामुळे अंबरनाथसारख्या शहरात लोकसंख्येच्या घनतेचा अंदाज आपल्याला येऊ  शकतो. लोकसंख्या अधिक आणि क्षेत्रफळ कमी अशा कोंडीत सापडलेल्या अंबरनाथ शहरात वाहतूक कोंडीने उग्र स्वरूप धारण केले आहे.

रेल्वे स्थानक हे सर्वच चाकरमान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. आज नोकरीनिमित्त अंबरनाथची निम्म्याहून अधिक लोकसंख्या रेल्वे वाहतुकीचा वापर करते. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. त्यात बाजारपेठ आणि महत्त्वाच्या संस्थाही याच स्थानक परिसराशेजारी आहेत. पालिका मुख्यालय, तहसीलदार कार्यालयही रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे येथे अनेक नागरिकांची वर्दळ असते. त्यात रिक्षा, खासगी दुचाकी, चार चाकी आणि अनेक मोठी वाहनेही कोणत्या न कोणत्या कारणांसाठी स्थानक परिसरात येत असतात. त्यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडते. रेल्वे स्थानक म्हटले की त्याबाहेर बेकायदा रिक्षा थांबे, रिक्षाचालकांनी आपल्या सोयीसाठी उभ्या केलेल्या रिक्षा, फुकटय़ा पार्किंगसाठी रस्त्याच्या आणि दुकानांच्या बाहेर गाडी लावणाऱ्या दुचाकीस्वारांची त्यात आणखी भर पडते. हे कमी होते की काय म्हणून रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलापासूनच फळ-भाजी विक्रेत्यांची रांग सुरू होते. पादचारी पूल उतरल्यानंतरही ही बेकायदा गर्दी काही संपत नाही. रेल्वे स्थानकाबाहेरही खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा, भाजीची दुकाने आणि फेरीवाले बसून असतातच. त्यामुळे अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या दोन्ही दिशांना चालण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. रेल्वे स्थानकाबाहेरच्या बेकायदा रिक्षा थांब्यांनी या वाहतूक कोंडीत मोठी भर घातली आहे. स्थानकाच्या दोन्ही बाजूंना अध्र्या डझनच्या आसपास रिक्षा थांबे आहेत. त्यातला एकही रिक्षा थांबा अधिकृत नाही. त्यात भाडे मिळवण्याच्या नादात रिक्षाचालक थेट शिवाजी चौकात वाहने उभी करत असल्याने सायंकाळच्या वेळी येथे चालणेही मुश्कील होऊन जाते. वाहतूक विभागाकडून अशा रिक्षाचालकांवर वारंवार कारवाई करूनही दोन-तीन दिवसांतच परिस्थिती ‘जैसे थे’ होऊन जाते. त्यामुळे नागरिकांनी करायचे काय, असा प्रश्न पडतो आहे.

अंबरनाथ पश्चिमेतही काही वेगळी परिस्थिती नाही. स्थानकाबाहेर पडल्यानंतर रिक्षाचालक आणि विक्रेत्यांची मोठी गर्दी आपणास पाहावयास मिळते. जवळच पालिका मुख्यालय असल्याने तिथे नगरसेवक, पालिका अधिकारी आणि नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर ये-जा असते. त्यामुळे तेथेही वाहनांमुळे वाहतूक कोंडी पाहावयास मिळते. शेजारीच कल्याण-बदलापूर महामार्ग असून तिथेही नियोजनाचा मोठा फटका बसतो आहे. कल्याण-बदलापूर मार्गाचे काम पूर्ण होत नसल्याने त्यावर बेकायदा पार्किंग, रस्त्याच्या कडेला अतिक्रमण सातत्याने होते आहे. त्यामुळे येथेही वाहतुकीचा वेग मंदावलेला पाहायला मिळतो आहे. पोलीस ठाणे, पालिका मुख्यालय, तहसीलदार कार्यालय अशी महत्त्वाची कार्यालये एकाच रस्त्यावर असल्याने अनेकदा येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यात पार्किंगचा प्रश्नही मोठा आहे. एमएमआरडीएकडून बांधण्यात आलेला स्कायवॉकही तितकासा उपयोगात येत नसून त्यावरही अस्वच्छता मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकही रस्त्यावरूनच चालणे पसंत करतात. यंदाच्या पावसाने रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांचे चालणेही मुश्कील झाले होते. त्यामुळे या कोंडीत अधिकच भर पडली. रेल्वे स्थानकाच्या बाहेर नियोजनानुसार काही आरक्षण ठेवणे गरजेचे होते. मात्र तेही पालिकेकडून झाले नाही. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण खुले नाटय़गृह पाडून तेथे नव्याने वास्तू उभारण्याचा घाट घालण्यात आला. मात्र शेवटी नाटय़गृह झालेच नाही. त्या जागी आता वाहनतळ बांधण्यात येत आहे. मात्र त्याचेही बांधकाम कूर्मगतीने सुरू आहे.

वाहतुकीसाठी हवे नियोजन

एकंदरीत सध्या अंबरनाथ शहरात रेल्वे स्थानक परिसरात सर्वाधिकवाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. प्रमुख रस्त्यांवर अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी दिसते. बेकायदा हातगाडय़ा, वाहनांचा वावर, बेकायदा रिक्षा थांबे, पार्किंगची जागा उपलब्ध नसणे, कल्याण-बदलापूर महामार्गाचे रखडलेले काम अशी अनेक कारणे या वाहतूक कोंडीमागे आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण खुले नाटय़गृहाच्या जागेवर सुरू असलेल्या पार्किंगच्या नव्या वास्तूचे काम लवकरात लवकर मार्गी लावणे, रिक्षाचालकांवर वचक ठेवणे, बेकायदा फेरीवाले आणि अतिक्रमणांना आळा घालणे, कल्याण-बदलापूर महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे अशी अनेक कामे युद्धपातळीवर हाती घेणे गरजेचे आहे. रस्त्यांची रुंदी कमी असल्याने रिक्षा थांबे, खासगी वाहनांसाठीची ये-जा यावरही बंधने घालणे आवश्यक आहे. रिक्षा थांबे, रिक्षा थांब्यांवरील रिक्षांची संख्या यांचाही विचार एकदा वाहतूक विभागाने करायला हवा. एकेरी वाहतुकीचा प्रयोगही अमलात आणून तो यशस्वी करण्याचा प्रयत्न पालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या मदतीने केल्यास शहरातील वाहतूक कोंडी काही अंशी कमी होण्यास मदत होईल. पालिका प्रशासनासोबतच वाहतूक विभागाचाही वाहतूक कोंडीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. फक्त तात्कालिक कारवाई करून प्रश्न मार्गी लागणार नसून त्यासाठी एखादा विकास आराखडा तयार करण्याची गरज आहे. त्यामुळे पालिका, वाहतूक विभाग, पोलीस, रिक्षाचालक संघटना आणि राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन यावर विचार करण्याची गरज आहे.