येथील साकेत भागातील ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीत महापालिकेने उभारलेल्या तात्पुरत्या कोवीड रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा अंत्यविधी चार दिवसांपुर्वीच दुसऱ्या रुग्णाच्या नावाने उरकण्यात आल्याचा  प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे. ज्या रुग्णाच्या नावाने त्यांचा अंत्यविधी उरकण्यात आला, तो रुग्ण जिवंत असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचेही समोर आले. या प्रकारामुळे रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

ठाणे येथील साकेत भागातील ग्लोबल इम्पॅक्ट हब इमारतीमध्ये महापालिकेने एक हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले असून या रुग्णालयामध्ये २९ जून रोजी भालचंद्र गायकवाड (७१) या उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अर्धागवायु असल्यामुळे ते चालूही शकत नव्हते. असे असतानाही ते रुग्णालयातून बेपत्ता झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी कुटूंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून कापुरबावडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पण आता त्यांचा अंत्यविधी जनार्दन सोनावणे यांच्या नावाने करण्यात आल्याचे समोर आले आहे.  विशेष म्हणजे या घटनेच्या तीन दिवसांनी म्हणजेच सहा जुलैला रुग्णालय प्रशासनाने सोनावणे यांच्या कुटुंबियांना बोलावून चूक झाल्याचे सांगितले.

कोपरी येथील सिद्धार्थनगरमध्ये राहणारे जनार्दन शंकर सोनावणे (६७) यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना ३० जून रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

‘दोषींवर कारवाई करा’

महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हब रुग्णालयातून बेपत्ता असलेल्या रुग्णाचा अंत्यविधी जिवंत रुग्णांच्या नावाने उरकल्याची बाब भाजपने उघडकीस आणली असून याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे.