बदलापुरात गणेशोत्सवाची वेगवेगळी रूपे आता समोर येत असून पर्यावरणपोषक उत्सवाचा एक भाग म्हणून आता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी पंचधातूच्या मूर्तीची स्थापना करण्याचे प्रमाणही यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. शहराच्या वाढत्या आकारामुळे घरगुती व सार्वजनिक गणपतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील विसर्जन स्थळांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळेच काही जाणत्या व पर्यावरणप्रेमी भाविकांनी आपल्या घरी गणपतीच्या पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
बदलापूर व अंबरनाथमध्येही अनेक ठिकाणी या पंचधातूच्या मूर्ती सध्या बघावयास मिळत आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा हे प्रमाण वाढले आहे, असा दावा केला जात आहे. बदलापुरात घरगुती व सार्वजनिक गणपतींची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी बदलापुरातील उल्हास नदी, बेलवली येथील शिवमंदिर तळे, कात्रप येथील गणेश विसर्जन घाट आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होताना दिसते. गणेशमूर्ती या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने या मूर्ती बरेच दिवस नदीत तशाच राहत आहेत. तर काहींनी शाडूच्या मातीच्या मूर्ती आणल्यामुळे त्या किमान पाण्यात विरघळत आहेत. पण या मूर्तीची संख्या कमी आहे. त्यामुळे जलप्रदूषणात भरच पडत आहे. यासाठी अनेकांनी या मूर्तीऐवजी पंचधातूच्या मूर्ती घरी खास बनवून घेतल्या आहेत. या मूर्तीची किंमत काहीशी जास्त असून ती मूर्तीच्या आकारावर अवलंबून आहे. बदलापुरात अनेक घरांमध्ये पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे चित्र दिसत आहे.
ही मूर्ती कायमस्वरूपी घरीच ठेवण्यात येते व घराबाहेर आणून पाण्याच्या हौदात अथवा पिंपात तीन वेळा बुडवून तिचे विसर्जन करण्यात येऊन पुन्हा घरात ठेवून दिली जाते. मूर्तीचे नदीवर जाऊन विसर्जन करण्याची गरज भासत नाही. मूर्ती कायमस्वरूपी घरात ठेवण्यात येते व उत्सवाच्या दिवशी तिची प्रतिष्ठापना करण्यात येते. यामुळे पर्यावरणपूरक उत्सव साजरा होतो व उत्सवाचा आनंदही कायम राहतो, असे सचिन जोशी यांनी सांगितले.