काटई-बदलापूर महामार्गावर ठिकठिकाणी घाणीचे ढीग

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये सध्या सर्वत्र स्वच्छता सर्वेक्षणाचे वारे वाहात आहेत. या शहरांतील स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासन विशेष मोहिमा राबवत असताना शहरांच्या वेशीवर मात्र कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. शहरांच्या हद्दीला लागून असलेल्या ग्रामपंचायतींमधून जाणाऱ्या महामार्गाशेजारी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. काटई नाका ते बदलापूर या महामार्गावर ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासला जात आहे.

देशात आणि राज्यात स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून मोठय़ा महापालिका, नगरपालिकांच्या स्वच्छतेची तपासणी सुरू आहे. यात सर्वच महापालिका आणि नगरपालिकांतील विविध प्रभागात कचरा वर्गीकरण, प्रक्रिया असे अनेक प्रयोगही राबवले आहेत. मात्र ही स्वच्छता फक्त त्या महानगरांपुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र समोर आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या वेशीवर असलेल्या गावांमध्ये मात्र सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते आहे. डोंबिवलीच्या वेशीवर असलेल्या काटई फाटय़ापासून महामार्गाने बदलापूरच्या दिशेने निघाल्यास ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणावर फेकलेला कचरा पाहायला मिळतो. काटई फाटय़ाच्या पुढे कोळेगाव ते हेदुटणे ते खोणी फाटा या भागांत रस्त्याच्या दुतर्फा हा फेकलेला कचरा दिसून येतो. तसेच पुढे धामटण, नेवाळी फाटा, डावळपाडा या गावातून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेला काहीशे फुटांपर्यंत कचरा पसरलेला दिसतो. त्यात प्लास्टिकच्या कचऱ्याचा मोठा भाग दिसतो.

अनेकदा गावकरी येथील कचरा जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यामुळे महामार्गावरील वाहनचालकांना धुराचा त्रास सहन करावा लागतो. सर्व कचरा एकत्रितपणे फेकला जात असल्याने अनेकदा येथे दुर्गंधीही सुटते. मात्र हा कचरा फक्त गावकऱ्यांचा नसून आसपासच्या शहरातील काही छोटी कचऱ्याची वाहनेही इथे छुप्या पद्धतीने खाली केली जातात, असा आरोप ग्रामस्थ करतात. तसेच महामार्गाला लागून असलेल्या अनेक हॉटेल आणि धाब्यांमध्ये उरलेले शिळे अन्न आणि कचराही येथे टाकला जात असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या प्रवाशांसमोर अस्वच्छतेचे चित्र उभे राहते. यामुळे या भागाची बदनामीही होत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

महामार्गालगतच्या झाडांना धोका

महामार्गाशेजारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे. गेल्या तीन-चार वर्षांत झाडांचे संगोपन चांगले झाल्याने त्यांची उंची वाढली. मात्र अशा कचऱ्यामुळे या झाडांनाही धोका पोहोचण्याची भीती प्रतिष्ठानच्या सदस्यांनी व्यक्त केली.

ग्रामपंचायतीकडे स्वत:ची कचराभूमी नाही, त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या कचराभूमीवर कचरा टाकण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यात अपयश आले. आता पुन्हा कचराभूमीचा शोध सुरू असून कचरा प्रक्रियेसाठीही प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत त्यात यश येईल.

चैनू जाधव, सरपंच, नेवाळी