११ कामगारांची प्रकृती अत्यवस्थ

शहाड (कल्याण) मधील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गुरुवारी रात्री गॅसची गळती होऊन एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला. तर गॅस नाकातोंडात गेल्याने ११ कामगारांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर कल्याणमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहाड येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीत गॅस वाहिनी दुरुस्तीचे काम गुरुवारी रात्री नऊ वाजता सुरू होते. त्या वेळी एका वाहिनीतून अचानक विषारी वायूची गळती झाली व तेथे उपस्थित असलेल्या कामगारांच्या नाकातोंडात गॅस गेला. यापैकी संजय शर्मा (३४) या कामगाराला सर्वाधिक बाधा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. संजय हा हंगामी कामगार म्हणून कंपनीत कार्यरत होता. या घटनेत अन्य ११ कामगारही अस्वस्थ झाले. त्यांना तातडीने उपचारांसाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभाग, गॅस गळती प्रतिबंधक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या.

ही दुरुस्ती सुरू असताना कामगारांना कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या. या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप कामगार आणि अत्यवस्थ कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे. गॅस वाहिनी दुरुस्तीचे काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होणार होते, पण त्याऐवजी हे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला होत्या. त्यातून हा प्रकार घडला असल्याची चर्चा कामगारांमध्ये सुरू आहे. कामगाराचा मृत्यू झाल्याचे कळताच काही काळ कंपनी परिसरात तणावाचे वातावरण होते. कंपनी परिसरात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

विषारी वायू गळती न झाल्याचा दावा

व्यवस्थापनाने मात्र कंपनीतून कोणत्याही प्रकारची विषारी वायू गळती न झाल्याचा दावा केला आहे. कंपनीच्या स्टीम बाथ विभागातील वाहिन्या बदली करण्याचे काम सुरू होते. काम करीत असताना संजय शर्मा यांना अत्यवस्थ वाटू लागले. मात्र कंपनीत काम करीत असल्याने त्याची तब्येत बिघडल्याने शर्मा कुटुंबाला पाच लाख रुपये नुकसानभरपाई, पत्नीला कंपनीत नोकरी, कंपनी वसाहतीत राहण्यासाठी घर आणि मुलांच्या शिक्षणाची सोय सेंच्युरी रेयॉनतर्फे केली जाईल, अशी माहिती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली.