‘नोटाबंदीच्या जनमानसावर झालेल्या जखमा अधिक चिघळू नयेत, यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि सावधगिरीने नियोजन करत अनेकांना खूप काही दिले आहे, असे वाटायला लावणारा हा अर्थसंकल्प आहे,’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले. ठाणे भारत सहकारी बँक लि. तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०१७’ या विषयावरील व्याख्यानात बोलताना कुबेर यांनी अर्थसंकल्पातील विविध मुद्दे उपस्थितांसमोर सहजसोप्या शब्दांत उलगडून दाखवले.

निश्चलनीकरणानंतर देशात निर्माण झालेली परिस्थिती आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर होऊ घातलेला परिणाम या पाश्र्वभूमीवर सादर झालेल्या या अर्थसंकल्पाबाबत अनेकांना उत्सुकता होती. त्यामुळे ठाणे भारत सहकारी बँक लि. तर्फे ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी बँकेचे अध्यक्ष मा. य. गोखले हेदेखील उपस्थित होते.

[jwplayer 5i2fQEnk]

‘योजना खर्च आणि योजनाबाह्य़ खर्च अशा स्वतंत्र मांडणीऐवजी खर्चाचा एकच तपशील सादर करण्याचा निर्णय, रेल्वे अर्थसंकल्पाचा मुख्य अर्थसंकल्पातच समावेश आणि नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या नोटाबंदीनंतरची परिस्थिती, यांमुळे यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे,’ असे सांगताना कुबेर म्हणाले, ‘योजनेच्या खर्चापेक्षा योजनाबाह्य़ खर्च किती असावा याचे अर्थशास्त्रीय संकेत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत योजनेचा खर्च आणि योजनाबाह्य़ खर्च यात १४१ टक्कय़ांचा फरक दिसून आला. या पाश्र्वभूमीवर खर्चाचा एकच तपशील देण्याचा निर्णय स्तुत्य आहे.’

‘गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत या वर्षीच्या अर्थसंकल्पात तरुण वर्ग हा घटक वाढवण्यात आला आहे. मात्र तरुणांच्या गटाला संबोधित करायचे असल्यास रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान देशासमोर आहे. दर महिन्याला किमान दहा ते बारा लाख नोकऱ्या तयार होणे अपेक्षित आहे,’ असे निरीक्षण कुबेर यांनी या वेळी नोंदवले. यांत्रिकीकरणामुळे अमेरिकेत १८ महिन्यांत ३५ टक्के नोकऱ्या गेल्याचे उदाहरण देत, वाढत्या यांत्रिकीकरणाचा फटका देशातील रोजगारनिर्मितीलाही बसू शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. यावर्षीपासून वस्तू आणि सेवाकर लागू करण्याचा निर्णय चांगला असला तरी या करप्रणालीतून पेट्रोलसहित २८ घटक वगळण्यात आल्याने या योजनेचा प्रत्यक्ष फायदा किती मिळेल, याबाबत साशंकता असल्याचे ते म्हणाले.  या वेळी उपस्थित श्रोत्यांनी अर्थसंकल्पाविषयी विचारलेल्या प्रश्नांना कुबेर यांनी उत्तरे दिली. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर देसाई यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर, बँकेचे उपाध्यक्ष उत्तम जोशी यांनी आभार प्रदर्शन केले.

[jwplayer ZL8IBmbt]